गुरगाव : मुसळधार पावसानंतर शहरात वाहतुकीची अभूतपूर्व कोंडी झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी गुरगावचे पोलीस आयुक्त नवदीपसिंग विर्क यांची शनिवारी रोहतक येथे बदली करण्यात आली. गुरगावमध्ये वाहतुकीची स्थिती सुधारत असली तरी नव्याने काही ठिकाणी पुन्हा कोंडी झाल्याचे वृत्त आहे. शहराच्या अनेक भागांत अद्यापही पाणी साचले असून, त्यामुळे लोकांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे.मुसळधार पावसामुळे शुक्रवारी शहराचे अनेक भाग आणि रस्ते जलमय होऊन वाहतुकीची न भुतो अशी कोंडी झाली होती. महामार्गावर वाहनांच्या १५ कि.मी.पर्यंत रांगा लागल्यासह हजारो लोक अनेक तास अडकून पडले होते. हलता येईना अन् डुलता येईनाच्या स्थितीमुळे हाहाकार माजला होता. ही समस्या शनिवारी काही अंशी सुटली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी हीरो होंडा चौकासह शहरातील १४ महत्त्वपूर्ण ठिकाणी पोलीस ठेवण्यात आले आहेत. वाहतूक संथ गतीने सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. वाहतूककोंडी काही अंशी फुटली असली तरी सोहना रोडसह इतर प्रमुख मार्गांवर नव्याने वाहतूक विस्कळीत झाल्याचे वृत्त असून, बादशाहपूर वाटिका चौकात ५ कि.मी.पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.दिल्ली व उपनगरांत मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. ८वर प्रचंड पाणी साचल्यामुळे वाहतूककोंडी झाली. या मार्गावर दोन दिवसांपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शहर ठप्प झाल्यामुळे प्रशासनाला हीरो होंडा चौकात जमावबंदी लागू करण्यासह शाळा दोन दिवस बंद ठेवण्याचे आदेश द्यावे लागले होते. शहरातील मुख्य चौकांत जमावबंदी लागू केल्यानंतर वाहतूक काही अंशी सुधारली. वाहतूक सुरू झाल्यानंतर शुक्रवारी रात्री जमावबंदीचे आदेश मागे घेण्यात आले. मात्र, रात्रभरच्या पावसामुळे वाहनांची गती मंदावली. राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ आणि शहरात हीरो होंडा चौक, राजीव चौक, झरसा चौक, सिग्नेचर टॉवर चौक, इफ्को चौक, शंकर चौक, सुभाष चौक, सोहना रोड, गोल्फ कोर्स एक्सटेंशन रोड, सोहनाचा मुख्य चौक, महाराणा प्रताप चौक, मानेसर चौक, हुडा सिटी सेंटर स्टेशन येथे २४ तास पोलीस असून, ते वाहतुकीचे नियमन करीत आहेत. (वृत्तसंस्था)>हुड्डांचा हल्लामाजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा यांनी वाहतूककोंडीसाठी खट्टर सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, मला अनेकांकडून ते अनेक तास अडकून पडल्याचे समजले. हे संकट टाळता आले असते. आमच्या काळात द्वारका द्रुतगती महामार्गाचे ९० टक्के काम पूर्ण केले होते. या सरकारला २ वर्षांत १० टक्के कामही पूर्ण करता आले नाही.
वाहतुकीची कोंडी पोलीस आयुक्तांनाच भोवली
By admin | Published: July 31, 2016 5:30 AM