नवी दिल्ली - राजधानी नवी दिल्लीत मंगळवारी मोठी दुर्घटना टळली. नोएडाला दक्षिण दिल्लीशी जोडणाऱ्या मजेंटा लाइनवर मेट्रो रेल्वेची चाचणी सुरू असताना मेट्रो रेल्वे कालिंदी कुंज डेपोजवळ स्थानकाची भिंत तोडून बाहेर आली. मात्र सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. तांत्रिक त्रुटींमुळे हा अपघात झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मेट्रोच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तांत्रिक बिघाडामुळे रेल्वेचा ब्रेक लागला नाही. त्यामुळे रेल्वे अनियंत्रित झाली आणि भिंत तोडून स्टेशनच्या बाहेर गेली. दरम्यान, या प्रकाराची चौकशी करण्यात येणार असल्याचे मेट्रोच्या सूत्रांनी सांगितले आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनी 25 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी बॉटनिकल गार्डन मेट्रो स्टेशन येथून हिरवा झेंडा दाखवून या मार्गाचे उदघाटन करणार आहेत. 13 किलोमीटर लांब असलेल्या या मेट्रो मार्गाच्या उदघाटन सोहळ्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सुद्धा सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.