राजस्थानच्या आदिवासीबहुल डुंगरपूर जिल्ह्यातील दीपिका पाटीदारनेही प्रियकर इरफान हैदरसोबत कुवेतमध्ये धर्मांतर केलं आहे. दीड महिन्यापूर्वी दीपिका आपली दोन मुलं आणि पतीला सोडून गुपचूप कुवेतला गेली होती. तिचा इरफान हैदरसोबतचा फोटो सोशल मीडियात पाहिल्यानंतर कुटुंबीयांनी समाजातील लोकांसह पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन याबाबत तक्रार केली. त्यानंतर दीपिकाने आता 4.59 मिनिटांचा टिकटॉक व्हिडीओ व्हायरल करून इस्लाम धर्म स्वीकारल्याचं सांगितलं आहे. यासोबतच तिने पती आणि सासरच्या लोकांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
दीपिका ही डुंगरपूर जिल्ह्यातील चित्री पोलीस स्टेशन परिसरातील भेमाई येथील रहिवासी आहे. दीपिकाच्या कुटुंबीयांनी तिला मायदेशी परत येण्यास सांगितलं आहे. दीपिकाच्या पतीने 13 जून रोजी चित्री पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. आपल्या दोन मुलांना सोडून दीपिका गुजरातमधील हिम्मतनगर नवघरा येथील रहिवासी इरफान हैदरसोबत कुवेतला गेली. हा प्रकार सासरच्या मंडळींना आणि गावातील लोकांना कळताच त्यांनी एसपी कार्यालय गाठलं. इरफानवर दीपिकाचे ब्रेनवॉश करून तिचा धर्म बदलल्याचा आरोप केला.
दीपिका पाटीदारचा एक टिकटॉक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दीपिकाने या व्हिडिओची सुरुवात सलावालिक्कूमने केली आहे. व्हिडीओमध्ये दीपिकाने तिचे नाव दीपिका उर्फ नजीरा असल्याचं सांगितलं आहे. ती म्हणाली की, "मी घर सोडण्यामागे अनेक कारणं आहेत. मी खूप त्रस्त होते. 10 वर्षांपासून माझ्यासोबत काय काय घडत होतं. मला मुलं असल्याने मी ते सहन करत होते. मात्र आता ते सहन होत नसल्याने हे पाऊल उचलण्यात आलं आहे."
"माझ्या इथे येण्यामागे कोणाचा हात नाही. मी स्वेच्छेने आले आहे. माझ्या इच्छेने इस्लाम स्वीकारला आहे. मी खूप अस्वस्थ झाले होते" असं दीपिका म्हणाली. दीपिकाने व्हिडीओमध्ये सासर आणि सासरच्या लोकांवरही अनेक गंभीर आरोप केले आहेत. सासरच्या मंडळींवर गैरवर्तन, विनयभंग, रात्री खोलीचा दरवाजा ठोठावल्याचा आणि चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप केला आहे. दीपिकाच्या म्हणण्यानुसार, तिने पती मुकेश पाटीदार आणि सासरे आणि कुटुंबातील सदस्यांना अनेक वेळा सासरच्या लोकांच्या या सर्व गोष्टी सांगितल्या. मात्र कोणीही लक्ष दिले नाही.
नवऱ्यानेही साथ दिली नाही तेव्हा ती नाराज झाली. त्याने 6 ते 7 वेळा आत्महत्येचा प्रयत्नही केला. तिने अनेकवेळा पती मुकेशला मुंबईच्या हॉटेलमध्ये सोबत घेऊन जाण्यास सांगितले. पण त्याने लक्ष दिले नाही. पतीशी पत्नीसारखे संबंध नव्हते. या सर्व कारणांनी त्रस्त होऊन तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला.
व्हिडिओमध्ये दीपिकाने फोनवर धमक्या आल्याचेही सांगितले आहे. तिचा छळ होत असताना सासरचे लोक आणि गावातील लोक कुठे होते असा प्रश्न विचारला आहे. त्यावेळी तिच्या मदतीला कोणीही आले नाही. कुवेतमध्येही बरेच लोक फोन करून धमक्या देतात. जीवे मारण्याची धमकी देतात. याचा मला त्रास झाला आहे. मला हे पाऊल उचलावे लागले. मी माझ्या मुलांवर माझ्या जीवापेक्षा जास्त प्रेम करते असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.