मध्य प्रदेशच्या राजगढ जिल्ह्यातील जुनापानीजवळ ७० वर्षे जुन्या मंदिर परिसरात एका युवकाने बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींसारखाच दरबार भरवला आहे. हनुमंत दास असं या युवक बाबाचे नाव असून तो सेम टू सेम बागेश्वर बाबा सारखाचे भक्तांच्या अडचणी जाणून घेतोय. भक्तांच्या गर्दीतून चिठ्ठीवर नाव लिहून एका भाविकाला बोलावले जाते. त्यानंतर, कागदावरुन लिहून तो त्यांची अडचण आणि त्यावरील उपायही सांगतो. रविवार आणि सोमवारी याठिकाणी दिव्य दरबार लावल्यानंतर आता तो बाबा निघून गेला आहे. बागेश्वर बाबांचा डुप्लीकेट असलेल्या या युवक बाबाची आता चंर्चा रंगलीय.
हनुमंत दास आता पुन्हा एप्रिल महिन्यात ३ दिवसांचा दरबार लावणार आहे. जीरापुर क्षेत्र परिसरात रामगढनजीक जूनागढ़ येथे शिवधाम आहे. येथे ग्रामस्थांद्वारे भागवत कथेचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यामध्ये, कथावाचक महेश शास्त्री व आकाश शास्त्री यांनी केलं. उज्जैनच्या महेश शा़स्त्री यांनी दिव्य दरबार भरवणाऱ्या हनुमंत दास यांच्याबद्दल गावकऱ्यांना माहिती दिली होती. त्यानंतर, ग्रामस्थांनी दास यांना आमंत्रित केलं होतं. त्यानुसार, दोन दिवसांसाठी गुना जिल्ह्यातील राधौगढ़ येथील मंशापूर्ण हनुमान मंदिराचे सेवक असलेल्या हनुमंत दास (३० वर्षे) यांनी आमंत्रण स्विकारत येथे आगमन केले. त्यांनी बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री यांच्याप्रमाणेच रविवार व सोमवारी दरबार भरवला. कथा मंडपात मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ जमले होते. त्यानंतर, हनुमंत दास दरबार मंडपात पोहोचले.
हातात हनुमंतांची गदा आणि गळ्यात हनुमंतांचं लॉकेट होतं. बाबांनी मंडपात येताच डोळे बंद करुन गादीला प्रणाम केला, त्यानंतर मंत्रोच्चार करत गादीवर बसले. त्यानंतर, गर्दीतील लोकांना बोलावून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच, समस्येंवर उपायही सांगितला. विशेष म्हणजे समस्येंवर उपाय सांगताना ते बागेश्वर बाबांप्रमाणेच भक्तांना चिठ्ठीवर लिहून देत. दरम्यान, वयाच्या १९ व्या वर्षांपासून हनुमंत दास पूजापाठ करत आहेत. विशेष म्हणजे हनुमंत दास यांनी बागेश्वर धामच्या धीरेंद्र शर्मा यांच्याकडूनच गतवर्षी दीक्षा घेतली आहे.