नवी दिल्ली : एरव्ही परदेशी क्रिकेटपटूंना सोशल मिडीयावरून प्रत्युत्तर देत प्रसिद्धीच्या झोतात असलेला माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनिवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. मात्र, भाजपात प्रवेश केल्यापासून सोशल मिडीयावर टीकेचा धनी ठरत आहे. पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघात प्रचारावेळी गंभीरने त्याचा डुप्लिकेट गाडीवर उभा केला होता आणि स्वत: त्याच एसी कारमध्ये बसल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे गंभीरवर टीका होत आहे.
पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून भाजपाने गौतम गंभीरलानिवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. तर त्याच्या विरोधात आपकडून आतिशी मार्लेना या उभ्या राहिल्या आहेत. आतिशींनी गौतम गंभीरवर गेल्या काही दिवसांत गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये गौतम गंभीरकडे दोन मतदान ओळखपत्रे असल्याचा दावाही करताना त्याच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल झालेली आहे. तसेच प्रचार पत्रकांवर पत्रकांची संख्या आणि मुद्रकाचे नाव न छापल्याचाही गुव्हा दाखल झालेला आहे. यापेक्षा गंभीर आरोप त्याच्यावर आतिशी यांनी गुरुवारी केला आहे.
मतदासंघातल्या काही ठिकाणी आतिशी यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर असलेली पत्रकं वाटण्यात आली. यामागे भाजपा आणि गौतम गंभीर असल्याचा आरोप मार्लेना यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये केला. गंभीर एखाद्या सशक्त महिलेविरोधात अशा प्रकारची पत्रकं वाटू शकतात. तर ते महिलांना काय सुरक्षा देणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांना पत्रकातील मजकूर वाचून दाखवत असताना रडू कोसळले होते. या प्रकरणी आपच्या उमेदवार आतिशी यांनी दिल्ली महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी गंभीरविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
या सर्व प्रकरणांवरून गंभीर ट्रोल होत असतानाच त्यात आता गंभीरच्या डुप्लीकेटची भर पडली आहे. गंभीरने प्रचार करताना वाहनावर उन्हामध्ये त्याचा डुप्लिकेट उभा केला होता. हा डुप्लिकेट डोक्यावर टोपी घालून होता. यामुळे लोकांच्या लक्षात येणार नाही, असा अंदाज त्यांना होता. मात्र, स्वत: गंभीर त्या वाहनामध्ये एसीमध्ये बसून होता. हे तेथील चाणाक्ष मतदारांनी ओळखले आणि या घटनेचे फोटो, व्हिडीओ सोशल मिडीयावर टाकले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा डुप्लिकेट चौकीदार अशी टीका केली आहे.