नवी दिल्ली - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष देतात, अगदी शाळेतील मुलांपासून ते संसदेतील भाषणापर्यंत त्याच्या कामाचं आणि प्रसंगावधानतेचं कौतुक होतं. देशातील शिक्षणात झालेली डिजिटल क्रांती अनुकरणीय असल्याचं सांगत त्यांनी नुकतेच एका शाळेला भेट दिली होती. यावेळी, शाळेतील विद्यार्थ्यांसोबत मोदींचा फोटो पाहून डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार होत असल्याचे दिसून आले. मात्र, ही शाळा बनावट असल्याची चर्चा आता सोशल मीडियावर सुरू झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) विद्यार्थ्यांना अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीनं दिल्या जाणाऱ्या शिक्षणाबद्दल माहिती देण्यासाठी एका शाळेला भेट दिली होती. यावेळी, मोदींनी लहान मुलांसोबत वर्गात बसून लॅपटॉपवर अभ्यासही केला. या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. मात्र या फोटोंमुळे मोदींना विरोधक ट्रोल करत आहेत. (Narendra Modi Photoshoot) “मोदींनी शाळेत नव्हे तर CGI स्टुडियोमध्ये बसून हे फोटोशूट केलंय” असा टोला काहींना लगावला आहे.
सिद्धार्थ नामक ट्विटर युजर्संने क्या ये सच है? असा सवाल करत दोन फोटोमधील फरक दाखवला आहे. तसेच, खिडकी नकली असून केवळ ५ मुलांचीच शाळा भरल्याचंही त्याने म्हटलंय.
दरम्यान, विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळावं यासाठी केंद्र सरकार शाळांमध्ये स्मार्ट वर्ग तयार करत आहे. या वर्गांमध्ये फळ्यांऐवजी LED स्क्रिनवरून शिकवलं जाईल. विद्यार्थी लॅपटॉवरून अभ्यास करतील. ज्या संकल्पना आधी पुस्तकात वाचून शिकवल्या जात होत्या. त्या आता विविध प्रकारच्या डॉक्युमेंट्री फिल्मद्वारे विद्यार्थ्यांना शिकवल्या जातील. अन् यासाठी केंद्र सरकार जवळपास १० हजार कोटी रुपयांची योजना राबवणार आहे. अशी माहिती या व्हिडीओंद्वारे दिली जात आहे. पण या व्हिडीओमध्ये मोदी ज्या वर्गात बसले आहेत तो वर्गच खोटा असल्याची टीका केली जात आहे.