नवी दिल्ली - संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांना संबोधित केले. राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणामध्ये सरकारने गेल्या सात महिन्यांत घेतलेल्या अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांचा उल्लेख केला. तसेच सध्या वादाचे केंद्र बनलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचाही राष्ट्रपतींनी उल्लेख केला. हा कायदा करून सरकारने महात्मा गांधींच्या इच्छेची पूर्तता केली, असे राष्ट्रपती म्हणाले. राष्ट्रपतींच्या या विधानानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.आपल्या अभिभाषणामध्ये राष्ट्रपती म्हणाले की, ''भारताने नेहमीच सर्वधर्म समभावाचा पुरस्कार केला आहे. फाळणीनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत जे नागरिक पाकिस्तानमध्ये राहू शकत नाहीत. ते भारतात येऊ शकतात, असे राष्ट्रपिता माहात्मा गांधी यांनी सांगितले होते. अशा नागरिकांना सामान्य जीवन जगण्याची संधी उपलब्झ करून देणे हे भारताचे कर्तव्य आहे. बापूजींच्या विचारांना पाठिंबा देताना अनेक राजकीय पक्षांनी हा विचार पुढे नेला याचा मला आनंद आहे. तसेच संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा करून त्यांच्या इच्छेचा मान राखला याचे मला समाधान आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यावेळी पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अत्याचारांचा निषेध केला. मी पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अत्याचारांचा निषेध करतो, तसेच आंतरराष्ट्रीय समुदायाने याची दखल घेऊन त्याला पायबंद घालण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याचे आवाहन करतो, असे राष्ट्रपती म्हणाले.