‘बिकिनी वॅक्सिंग’ करताना महिलेची त्वचाच सोलली! स्पा मालकाला ७० हजारांचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 08:42 AM2023-04-20T08:42:36+5:302023-04-20T08:43:54+5:30
Bikini Waxing: मध्य प्रदेशातील इंदूरमधील एका महिलेने ‘ब्राझिलियन (बिकिनी) वॅक्सिंग’वेळी शरीराची त्वचा सोलल्याने स्पा सेंटरविरुद्ध खटला दाखल केला होता. ही घटना नोव्हेंबर २०२१ मध्ये घडली होती
मध्य प्रदेशातील इंदूरमधील एका महिलेने ‘ब्राझिलियन (बिकिनी) वॅक्सिंग’वेळी शरीराची त्वचा सोलल्याने स्पा सेंटरविरुद्ध खटला दाखल केला होता. ही घटना नोव्हेंबर २०२१ मध्ये घडली होती, नुकताच ग्राहक न्यायालयाने स्पा मालकाला ७० हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला.
चंदननगरमधील रहिवासी महिला स्थानिक स्पा/सलूनमध्ये गेली होती. तिने ४,५०० रुपयांच्या प्रीमियम ब्राझिलियन (बिकिनी) वॅक्सिंगची निवड केली. वॅक्सिंगला सुरुवात होताच वॅक्स खूप गरम असून त्याने त्वचेला जळजळ होण्यासोबतच वेदनाही होत असल्याची तक्रार तिने केली होती. त्यावर, ‘वेदना आणि थोडी जळजळ सामान्य आहे, काळजी करू नका,’ असे आश्वासन तिला देण्यात आले.
तरीही, वॅक्सिंग चुकीचे झाले आणि पट्टी काढताना तिची त्वचा सोलून निघाली. त्यानंतर तिने कोर्टात धाव घेतली होती. न्यायालयाने मालकाला नुकसान भरपाईसाठी ३० हजार रूपये, मानसिक त्रास दिल्याबद्दल २० हजार रूपये आणि महिलेच्या वैद्यकीय उपचारासाठी २० हजार रूपये ३० दिवसांमध्ये देण्याचा आदेश दिला आहे.
दरम्यान, ‘आम्ही गेल्या आठवड्यात चार स्पा/सलून आणि गेल्या वर्षभरात सुमारे १५ स्पांविरुद्ध निकाल दिला आहे,’ असे जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाचे अध्यक्ष बलराज कुमार पालोडा म्हणाले. चुकीच्या वॅक्सिंगबाबत स्पा आणि सलूनविरुद्ध तक्रारी येण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांमध्ये सतत वाढत असल्याने नेटकऱ्यांमध्ये याबाबत चर्चा आहे.