बंगळुरु : कर्नाटकमधील कोडगू जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या संरक्षण मंत्री निर्मला सितारामन आणि कोडगूच्या पालकमंत्र्यांमध्ये बाचाबाची झाल्याचे वृत्त आहे. मंत्री एस. आर. महेश यांनी सितारामन यांच्यावर वैयक्तीक टीका केल्याने हा प्रकार घडल्याचे समजते.
कर्नाटकमधून राज्यसभेवर निवडून गेलेल्या निर्मला सितारामन या काल कोडगू जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेल्या होत्या. यावेळी त्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच खराब झालेले रस्ते लवकरात लवकर लष्कराकडून तयार करून देण्यात आश्वासनही त्यांनी पूरग्रस्तांना दिले. यावेळी पालकमंत्री एस. आर. महेश ही त्यांच्या सोबत होते.
यावेळी महेश आणि सितारामन यांच्यामध्ये बाचाबाची झाली. महेश यांनी त्यांच्यावर वैयक्तीक स्वरुपाची टीका केल्याने सितारामन चिडल्याचे वृत्त आहे. यावरून कर्नाटकमध्ये वाद निर्माणा झाला असून माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज संरक्षण मंत्र्यांना पूरग्रस्तांची पाहणी करण्यापेक्षा आमच्या मंत्र्यावरच वर्चस्व राखण्यात अधिक रस असल्याचा आरोप केला.
सितारामन या माजी सैनिकांच्या गटाशी बोलत होत्या. यावेळी रमेश यांनी त्यांना अधिकारी मदतकार्यासाठीच्या बैठकीची वाट पाहत असल्याचा निरोप दिला. मात्र, सितारामन या माजी सैनिकांशी बोलत राहिल्या व त्यांनी हा आमचा परिवार असल्याचे म्हटले. यानंतर महेश यानी सितारामन यांच्याकडे निधी वाढवून देण्याची मागणी केली. त्यावेळीही संरक्षण मंत्रालयाला आपला परिवार महत्वाचा आहे. त्यांच्याशी चर्चा करण्याचा कार्यक्रम आखला आहे, असे महेश यांना सांगितले. यावर महेश यांनी तुम्ही राज्यसभेवर निवडणून गेला आहात, तुम्हाला सामान्य जनतेचे महत्व नाही अशी टीका केली.
हा सर्व प्रकार जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी आणि प्रसारमाध्यमांसमोर घडला. यावर संरक्षण मंत्रालयाने आक्षेप घेतला असून मंत्र्यांनी परिवार हा शब्द संरक्षण मंत्रालयाच्या चार पैकी एक असलेल्या माजी सैनिकांच्या खात्याबद्दल वापरल्याचा खुलासा केला आहे. तसेच पालकमंत्री महेश यांचे बोलणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.
राजशिष्टाचारानुसार जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्री आपत्तीवेळी केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्याची आखणी करतात. केंद्रीय मंत्र्यांना त्यानुसार आखलेल्या कार्यक्रमांचे पालन करावे लागते.