नवी दिल्ली : रविवारी देशाच्या राजधानी दिल्लीत सुरु झालेला हिंसाचार आता थांबला आहे. बुधवारी दिल्लीत हिंसाचाराची कोणतीही मोठी घटना घडलेली नाही, परंतु शहरात अजूनही भीतीचे वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे. या हिंसाचारात आतापर्यंत 34 जणांचा मृत्यू झाला असून, अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली आहेत.
दिल्लीतील खजुरी खास भागातील एका कुटुंबाला सुद्धा याचा फटका बसला आहे. आज तक या वृत्तवाहिनीने याबाबतीत वृत्त दिले असून, एका व्यक्तीच्या घरात मुलीचे लग्न असताना हिंसाचाराच्या घटनेत त्यांचे घर जळून खाक झाले आहे. त्यामुळे त्यांच्या मुलीचं लग्न होऊ शकले नाही. तर मोठ्याप्रमाणावर आर्थिक नुकसान सुद्धा झाले आहे.
लग्नाची तयारी जवळपास पूर्ण झाली होती. वरात येणार म्हणून लग्नघरात स्वयंपाक करण्यात येत होते. यासाठी विविध मिठाई आणि गोड पदार्थ सुद्धा तयार करण्यात आली होती. घरात सर्वत्र आनंदाचे वातवरण होते. मात्र अचानक काही लोकांनी हल्ला केला आणि घरात आग लावून दिली. त्यामुळे काही क्षणात सर्वकाही जळून खाक झालं असल्याचे म्हणत, मुलीच्या वडिलांनी आपल्या अश्रुना वाट मोकळी करून दिली.
दरम्यान, दिल्लीत सुरु असणाऱ्या हिंसाचाराबाबतच्या सुनावणीवेळी दिल्ली पोलिसांवर ताशेरे ओढणाऱ्या न्यायाधीश एस मुरलीधर यांची बदली दिल्ली हायकोर्टातून पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात करण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनमधून न्यायाधीश एस. मुरलीधर यांच्या बदलीची अधिसूचना जारी करण्यात आली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्याशी चर्चा केल्यानंतर न्यायाधीश एस, मुरलीधर यांची बदली पंजाब हरियाणा हायकोर्टात केली. माहितीनुसार सुप्रीम कोर्टाच्या समितीने १२ फेब्रुवारीला दिल्ली हायकोर्टातील न्यायाधीश एस मुरलीधर यांची बदली पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात करण्याची शिफारस केली होती.