गुजरातमधील गँगस्टर आणि त्याच्या साथीदारांच्या घरावर टाकलेल्या छाप्यात अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीला मोठी रक्कम मिळाली. गँगस्टर सुरेश जगुभाई पटेल आणि त्याच्या साथीदारांच्या निवासी आणि व्यावसायिक परिसरांच्या झडतीदरम्यान, ईडीने मोठ्या स्थावर मालमत्तांचा शोध लावला. ईडीच्या छापेमारीत तब्बल १.६२ कोटी रूपयांची रोकड जप्त करण्यात आली असून त्यापैकी १ कोटी रूपये २ हजाराच्या नोटा होत्या.
दरम्यान, ईडीने १०० हून अधिक मालमत्तांशी संबंधित कागदपत्रे देखील जप्त केली आहेत. यामध्ये कंपन्या, फर्म आणि आस्थापना यांच्याशी झालेल्या व्यवहारांशी संबंधित अनेक कागदपत्रांचा समावेश आहे. तसेच डिजिटल पुराव्यांशिवाय तीन बँक लॉकर्स देखील आढळून आले. ईडीच्या पथकाने आरोपी सुरेश जगुभाई पटेल आणि त्याच्या साथीदारांच्या ९ निवासी आणि व्यावसायिक परिसरांची झडती घेतली. ईडीने ही छापेमारी गुजरातमधील दमण आणि वलसाडमध्ये केली.
गुजरातमधील या छापेमारीत २ हजारांच्या नोटांचा एवढा मोठा साठा सापडल्याने सर्वत्र चर्चा रंगली आहे. खरं तर काही दिवसांपूर्वीच रिझर्व्ह बँकेने २ हजार रुपयांची नोट चलनातून मागे घेण्याचा निर्णय घेतला. या नोटा चलनातून मागे घेतल्या जात असल्या तरी त्याची कायदेशीर मान्यता कायम आहे. रिझर्व्ह बँकेने ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत २ हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी आणि बदलण्याची मुदत दिली आहे. यासोबतच २ हजार रुपयांच्या नोटा बँकांनी तात्काळ प्रभावने देणे बंद करण्याचे निर्देशही रिझर्व्ह बँकेने बँकांना दिले आहेत. २३ मे पासून ग्राहकांना एकावेळी २ हजारांच्या १० म्हणजेच २० हजार रूपये मूल्याच्या नोटा बदलण्याची मुभा देण्यात आली आहे.