DMK Zakir Hussain: दक्षिणेकडील राज्यांमध्ये हिंदी भाषेवरुन गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद होताना दिसत आहे. आमच्यावर हिंदी भाषेची सक्ती केली जात असल्याचा आरोप दक्षिणेकडील विरोधकांनी केलाय. त्यामुळे तमिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलने देखील झाली आहेत. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्यासह द्रविड मुन्नेत्र कळघमनेही तामिळनाडूमधील हिंदीच्या विस्ताराला प्रचंड विरोध दर्शवला आहे. मात्र या द्रमुककडून सुरु असलेल्या विरोधादरम्यान, धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. हिंदीविरोधातील एका आंदोलनादरम्यान, द्रमुकच्या एका नेत्याने एका महिलेच्या हातातील बांगड्या काढण्याचा प्रयत्न केला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
द्रमुकचे नगरसेवक झाकीर हुसेन यांनी हिंदीविरोधात शपथ घेताना एका महिलेचा हात धरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी महिलेच्या हातातील बांगड्या काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी हुसेन यांच्या शेजारी असलेल्या एका महिलेने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतरही हुसेन महिलेच्या हातातील बांगड्या काढत होते. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर द्रमुकच्या नेत्याकडून उघडपणे छेडछाड केली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
३० सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये, द्रमुकचे झाकीर हुसेन एका महिला सहकाऱ्याच्या हातातून सोन्याची बांगडी काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मध्ये उभी असलेली दुसरी महिला त्यांचा हात बाजूला करते. पण ते पुन्हा एकदा बांगडी काढण्याचा प्रयत्न करतात.
तमिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनी हा व्हिडीओ पोस्ट करत द्रविड मुन्नेत्र कळघमवर टीका केली आहे. "कुन्नूर नगर परिषदेच्या वॉर्ड २५ चे द्रमुक नगरसेवक झाकीर हुसेन, हिंदीविरोधी आंदोलनाच्या नावाखाली बांगड्या चोरतात. ‘तिरुत्ता’ (चोर) आणि द्रमुक कधीही वेगळे होऊ शकत नाहीत!," अशी टीका अन्नामलाई यांनी केली आहे.
अन्नामलाई यांनी हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर त्याला १.३४ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आणि २००० हून अधिक वेळा तो रिट्विट करण्यात आला. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनीही कमेंट केल्या आहेत. एका नेटकऱ्याने त्याची सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही भीतीशिवाय महिलेचा हात धरण्याची हिंमत कशी मिळाली?, असा सवाल केला आहे. दुसऱ्या एका युजरने द्रमुकवर जोरदार टीका केली.