काँग्रेसची भारत जोडो यात्रा गेल्या एक महिन्यापासून सुरू आहे. ही यात्रा सध्या कर्नाटकमधील पडाव याठिकाणी आहे. या यात्रेला तरुणांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सर्वांचा प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी एक मुलगी आपल्या भावासह यात्रेत सामील झाली. यावेळी ती राहुल गांधी यांच्याजवळ ढसाढसा रडू लागली. या संदर्भात एक पोस्ट राहुल गांधी यांनी फेसबुकवर शेअर केली आहे.
राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेतील एक फोटो शेअर केला आहे. या फोटो एक मुलगी आणि तिचा भाऊ दिसत आहे. 'आज माझ्याशी बोलताना या मुलीला अश्रू अनावर झाले. त्यांना आपल्या राष्ट्राच्या मूलभूत मूल्यांबद्दल खूप प्रेम आणि आदर आहे. या तरुणांना, आपल्या देशातील इतर लाखो तरुणांप्रमाणेच, त्यांच्या स्वप्नांतील भारत डोळ्यांसमोर ठेचला गेल्याने खूप वेदना होत आहेत. ते स्वातंत्र्य आणि समानतेबद्दल शिकून मोठे झाले, ते प्रेम, समरसता आणि बंधुतेचा संदेश घेऊन मोठे झाले आहेत' असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
'परस्परविरोधी विचारसरणीमुळे तरुणांनी मित्र गमावले असून त्यांच्या भविष्याच्या आशा संपल्या आहेत, देशात संधी नसल्यामुळे' त्यांनी चांगल्या भविष्याची आशा गमावली आहे. असंही राहुल गाधी यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
. “मला वाटते की आरएसएस इंग्रजांना मदत करत होती आणि सावरकरांना इंग्रजांकडून मानधन मिळत होते. स्वातंत्र्यलढ्यात भाजप कुठेच नव्हता, अशी टीका राहुल गांधी यांनी भाजपवर केली.
स्वातंत्र्य लढ्यात भाजप कुठेही नव्हता, भाजप ही वस्तुस्थिती लपवू शकत नाही. काँग्रेस आणि त्यांचे नेते स्वातंत्र्यासाठी लढले आहेत."आम्ही फॅसिस्ट पक्ष नाही. आमचा पक्ष संवादावर विश्वास ठेवणारा पक्ष आहे,सध्या निवडणूक जिंकण्यासाठी संघ म्हणून काम करावे लागेल, हे आम्हाला माहीत आहे. देशात द्वेष आणि हिंसाचार पसरवणे हे देशविरोधी कृत्य आहे. द्वेष आणि हिंसाचार पसरवणाऱ्यांशी आम्ही लढणार आहे, असंही राहुल गांधी म्हणाले.
'रिमोट कंट्रोल' म्हणणे हा दोघांचा अपमान
यावेळी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर बोलताना राहुल गांधी म्हणाले, मला अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर आताच बोलायचे नाही. "काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी लढणार्या दोन्ही उमेदवारांची स्वतःची भूमिका आहे तसेच त्यांचा स्वतःचा दृष्टिकोन आहे. कोणालाही 'रिमोट कंट्रोल' म्हणणे हा दोघांचा अपमान आहे.