मुंबई : धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज या दिवाळीच्या दिवसांत सोने, चांदी आणि हिऱ्याच्या खरेदी-विक्रीने तब्बल सव्वादोन हजार कोटींचा आकडा ओलांडला आहे. ग्राहकांनी सोन्याएवढीच हिऱ्यांनाही पसंती दिली असून, युवा वर्गाला हिऱ्यांनी भुरळ पाडली आहे.
पाडवा आणि भाऊबीज या दोन दिवशी सोन्यामध्ये सहाशे कोटी रुपयांची उलाढाला झाल्याचा अंदाज आहे. आता देवदिवाळी आहे. तुळशीचे लग्न आहे. लग्नसराईही आहे. त्यामुळे हे दिवसही ग्राहकांनी राखून ठेवले आहेत. या दिवशी ग्राहक दाखल होत सोने घेऊन जातात. देवदिवाळीपर्यंत सोन्याची खरेदी विक्री होण्याची शक्यता आहे.
नव्या डिझाइन्सची भुरळ
इस्रायल युद्धामुळे हिऱ्यांचे दर कमी आले. हिऱ्याचा भाव आणि हिऱ्याचा उठाव बाजारपेठेत असल्याने कमी भावामुळे हिऱ्याची विक्री जास्त झाली आहे. नव्या पिढीला सोन्यापेक्षा हिऱ्याचे आकर्षण जास्त आहे. नवी संकल्पना, नव्या डिझाइन्स तरुणांना भुरळ घालत आहेत. सोन्याच्या प्रचंड भावामुळे हिऱ्याचे दागिनेही त्याच किमतीला येतात की काय, अशी स्थिती आहे. १० ते १२ हजारांपासून हिऱ्याच्या अंगठ्या येत आहेत. दरांतील फरकामुळे ज्यांनी कधी हिऱ्यांकडे लक्ष दिले नाही, असे ग्राहक हिरे घेत आहेत.
दिवाळीत सोन्याएवढीच हिऱ्यांची मागणी होती. विशेषत: तरुणाईने सोन्याऐवजी हिऱ्यांची खरेदी करण्यावर भर दिला. खरेदीचा ट्रेंड जानेवारीच्या सुरुवातीपर्यंत जोर धरून राहील. डिसेंबरमध्ये अधिकाधिक लग्न होतात. याच काळात मोठ्या सुट्ट्या असतात. त्यामुळे सोन्याच्या खरेदी-विक्रीचा ट्रेंड कायम राहील.- आनंद पेडणेकर, संचालक, जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.
भाऊबीजेला सोन्याचा भाव ५८ हजार प्रति तोळा होता. पाडव्याला सोन्याचे मार्केट चांगलेच वर आले होते. ग्राहकांनी सोन्याच्या खरेदीसाठी गर्दी केली होती. देवदिवाळी आणि लग्नसराईमुळे सोन्याच्या खरेदी विक्रीत भर पडेल.- निर्भय सिंग, सुवर्ण विक्रेते.