लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू सापडण्याच्या घटनाही घडू लागल्या आहेत. कर्नाटकमधील बेल्लारी येथे पोलिसांनी ५.६० कोटी रुपयांची रोख रक्कम, ३ किलो सोने आणि ६८ चांदीच्या छड्या दप्त केल्या आहेत. पोलिसांनी बेल्लारीमधील ब्रूस टाऊनमध्ये छापेमारी करून हा ऐवज जप्त केला आहे. कंबली बाजारामधील हेमा ज्वेलर्सचे मालक नरेश यांच्या घरातून हे घबाड सापडले आहे. आरोपी नरेश यांना ताब्यात घेण्यात आलं असून, पुढील तपास सुरू आहे.
या घटनेबाबत बेल्लारीचे पोलीस अधीक्षक रंजीत कुमार बंडारू यांनी सांगितले की, या कारवाईमध्ये ५ कोटी ६० लाख रुपयांची रोख रक्कम, चांदीच्या ६८ छड्या आणि १०३ किलो चांदीचे दागिने तसेच ३ किलो सोने जप्त करण्यात आळे आहे.
दरम्यान, कारवाई करण्यात आलेल्या व्यक्तीकडे रोख रक्कम आणि सोने-चांदीबाबत कुठलीही वैध कागदपत्रे सापडलेली नाहीत. या प्रकरणात पोलिसांना हवाला व्यवहाराचा संशय असून, त्याबाबत तपास सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणी के.पी. अॅक्टमधील कलम ९८ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. तपासानंतर आयटी विभागाला याची माहिती दिली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.