डॉ. खुशालचंद बाहेती, कमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या काळात सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमाच्या अर्जावर अर्ज प्राप्त झाल्यापासून ३ दिवसांत निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. निवडणुकीच्या नावावर सार्वजनिक सभा, निदर्शने, रॅली परवानगीशिवाय काढण्यास प्रतिबंध करणारे आदेश सीआरपीसी १४४ अंतर्गत देशभरात जारी करण्यात आले आहेत. या आदेशाला आव्हान देणारी जनहित याचिका अरुणा रॉय व निखिल डे यांनी दाखल केली आहे.
त्यांनी मतदार जागृतीसाठी यात्रा काढण्याची परवानगी मागितली आहे. यापूर्वी विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांना परवानगी नाकारण्यात आली होती. १४४ सीआरपीसी अंतर्गत काढलेला सरसकट आदेश पाहून न्या. भूषण गवई व न्या. संदीप मेहता यांनी आश्चर्य व्यक्त करत असे सरसकट आदेश कसे काढले जाऊ शकतात, अशी विचारणा केली. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने १४४ च्या आदेशासाठी सार्वजनिक शांतता बिघडण्याची सकारण शक्यता असल्याची खात्री असणे आवश्यक असल्याचा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सरकारला नोटीस जारी करून दोन आठवड्यांत उत्तर मागितले आहे.