लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: भारतात प्रवासी वाहनांच्या घाऊक विक्रीत जुलै २०२४ मध्ये आदल्या वर्षाच्या तुलनेत २.३ टक्के घट झाली असल्याची माहिती वाहन उत्पादकांची शिखर संस्था ‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स’ने (सियाम) बुधवारी दिली. संस्थेच्या आकडेवारीनुसार यंदा जुलैमध्ये ३,४१,५१० प्रवासी वाहनांची घाऊक विक्री झाली असून, मागील वर्षी याच महिन्यात हा आकडा ३,५०,३५५ एवढा होता. या आकडेवारीमुळे ऐन पावसाळ्यातही बाईक आणि रिक्षासारख्या वाहन खरेदीला मोठी पसंती मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रवासी कारची विक्री १२ टक्क्यांनी घटली
सियामने म्हटले की, युटिलिटी वाहनांच्या विक्रीतील तेजीमुळे एकूण प्रवासी वाहनांच्या विक्रीला थोडे बळ मिळाले. यंदा जुलैमध्ये युटिलिटी वाहनांची विक्री ४.१ टक्के वाढली असून, या महिन्यात एकूण १,८८,२१७ एवढी युटिलिटी वाहने विकली गेली आहेत. जुलै २०२३ मध्ये हा आकडा १,८०,८३१ इतका होता. प्रवासी कारची विक्री १२ टक्के घटून ९६,६५२ वर आली. गेल्या वर्षी १,०९,८५९ कार विकल्या गेल्या.
कुठे घट, कुठे वाढ?
सियामचे अध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी सांगितले की, तीनचाकी व दुचाकी वाहने उत्तम कामगिरी करीत आहेत. प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत मात्र घसरण पाहायला मिळत आहे.जुलैमध्ये दुचाकी वाहनांची घाऊक विक्री १२.५ टक्के वाढून १४,४१,६९४ वाहनांवर पोहचली आहे. गेल्या वर्षी या वाहन विक्रीची संख्या १२,८२,०५४ एवढी होती. तीनचाकी वाहनांची घाऊक विक्रीसुद्धा ५.१ टक्के वाढून ५९,०७३ वर गेली.