नवी दिल्ली : दिल्लीतील गुरु गोविंद सिंग इंद्रप्रस्थ विद्यापीठाच्या (GGSIPU) पूर्व दिल्ली कॅम्पसचे उद्घाटन एलजी विनय कुमार सक्सेना आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एकत्रितपणे केले. मात्र, आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री केजरीवाल यांनी मंचावरून बोलण्यास सुरुवात करताच समोर बसलेल्या काही लोकांनी मोदी-मोदीच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. या घटनेने व्यथित झालेल्या मुख्यमंत्री केजरीवाल यांनी हात जोडून घोषणा देणाऱ्यांना थोडं थांबा आणि नंतर घोषणा द्या, असं आवाहन केलं.
दरम्यान, जर तुम्ही व्यत्यय आणणार असाल तर मी बोलू शकत नाही, असे केजरीवालांनी म्हटले. तसेच जर तुम्हाला कल्पना आवडत नसेल तर ते ठीक आहे. नाहीतर पाच मिनिटांत माझे बोलणे पूर्ण करू द्या. त्यानंतर तुम्ही कमेंट करू शकता. मध्येच बोलल्यामुळे मी बोलू शकत नाही. देशात लोकशाही आहे. प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. मी शिवीगाळ करत नाही, मी म्हणतोय ते बरोबर आहे. जर तुम्हाला ते आवडत असेल तर ठीक आहे आणि जर तुम्हाला ते आवडत नसेल तरी ते ठीक आहे, असेही केजरीवालांनी म्हटले. मात्र, त्यानंतरही लोकांना घोषणा दिल्या. मग विद्यापीठ प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर घोषणा देणाऱ्यांचा आवाज शांत झाला.
देशातील बेस्ट कॅम्पसया कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आणखी म्हटले, "आयपी युनिव्हर्सिटी पूर्व दिल्ली कॅम्पस देशाला समर्पित केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन. हे कॅम्पस भव्य आणि सर्व सुविधांनी परिपूर्ण आहे. हा परिसर सुंदर असून सर्व सुविधांच्या बाबतीत हा कॅम्पस देशातील सर्वोत्तम कॅम्पस आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. यासाठी मी संपूर्ण देशाचे अभिनंदन करतो कारण देशभरातून मुले इथे शिकण्यासाठी येतील. मी दिल्लीतील लोकांचे आणि विशेषत: पूर्व दिल्लीचे अभिनंदन करतो कारण पूर्व दिल्लीत अद्याप असे कॅम्पस तयार झाले नव्हते."