Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी(11 नोव्हेंबर 2024) झारखंडमधील भाजप कार्यकर्त्यांशी 'नमो ॲप'द्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसवर आरक्षणाच्या मुद्द्यावर जोरदार टीका केली. काँग्रेसला आरक्षणविरोधी असल्याचे म्हणत पंतप्रधान मोदी म्हणाले की, एक काळ असा होता की, पंचायत ते संसदेपर्यंत संपूर्ण देशात फक्त काँग्रेस होती. जोपर्यंत काँग्रेस सत्तेत होती, तोपर्यंत देशात आरक्षणावर बोलण्याची कुणाची हिंमत नसायची. काँग्रेस आवाज उठवणाऱ्यांना चिरडत असे. नेहरुंपासून ते राजीव गांधींपर्यंत...सर्वजण आरक्षणाचे कट्टर विरोधक राहिले आहेत, अशी घणाघाती टीका मोदींनी केली.
पंतप्रधान पुढे म्हणाले की, जेव्हा लोकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कळू लागले, तेव्हापासून एससी-एसटी-ओबीसी समाज एकत्र आले अन् काँग्रेस केंद्रात कधीच पूर्ण बहुमताने सरकार बनवू शकली नाही. आज देशातील मोजक्या राज्यांमध्ये काँग्रेसचे सरकार आहे, त्यामुळे काँग्रेसचे राजघराणे संतप्त झाले असून, त्यांनी आता एससी-एसटीची-ओबीसींना तोडण्याचा डाव आखला आहे. गेल्या काही वर्षांपासून हाच त्यांचा अजेंडा आहे.
काँग्रेसच्या जुन्या जाहिरातीचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी काँग्रेसच्या एका जुन्या जाहिरातीचा उल्लेख केला. ते म्हणाले, आज लोकांनी मला काँग्रेसची जुनी जाहिरात सोशल मीडियावर पाठवली. मला आश्चर्य वाटते की, कोणत्या प्रकारच्या जाहिराती त्या काळात प्रसिद्ध झाल्या. ही जाहिरात राजीव गांधी पंतप्रधान असतानाची आहे. त्या जाहिरातीमध्ये एससी-एसटी आणि ओबीसींना वाईट पद्धतीने दाखवले आणि त्यामुळे देशाचे किती नुकसान होईल, हे सांगण्यात आले.
पूर्वी श्रीमंतांच्या घरात गॅस सिलिंडर असायचा, गरीबांना गॅस सिलिंडरचा विचारही करता येत नव्हता. भाजपने उज्ज्वला योजनेतून देशातील प्रत्येकाच्या घरी गॅस सिलिंडर पोहोचवले. जिथे काँग्रेस सत्तेत आहे, तिथल्या जनतेची अशी फसवणूक झाली आहे. आपल्या पक्षाने खोटी हमी दिल्याचे स्वतः काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे म्हणतात, हे तुम्ही ऐकले असेलच. कुटुंबावर आधारित पक्ष केवळ भ्रष्ट नसून, समाजातील कर्तृत्ववान तरुणांच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहेत, अशी बोचरी टीकाही नरेंद्र मोदींनी केली.