मध्य प्रदेशमधील अशोकनगर येथे विकास यात्रेवर निघालेले मंत्री बृजेंद्र सिंह यांना या यात्रेदरम्यान मोठ्या नामुष्कीचा सामना करावा लागला. बृजेंद्र सिंह यांच्यावर काही व्यक्तींनी खोडसाळपणा करत खाजकुलीची पावडर टाकली. त्यामुळे मंत्रिमहोदयांना भर कार्यक्रमात अडचणींचा सामना करावा लागला. मध्य प्रदेशमधील अशोकनगर येथे स्वागत करताना काही मंडळींनी गुपचूप मंत्री महोदयांना खाजकुलीची पावडर लावली. त्यामुळे मंत्रिमहोदय शरीरावर येत असलेल्या खाजेने हैराण झाले. ही खाज इतकी असह्य झाली की, मंत्र्यांनी कार्यक्रम बाजूला टाकून गावातच स्नान केले आणि कपडे बदलले. त्यानंतर त्यांना काहीसे बरे वाटले. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मध्य प्रदेशमधील शिवराज सिंह सरकारमध्ये मंत्री असलेले मुंहवली येथील आमदार बृजेंद्र सिंह यादव भाजपाच्या विकासयात्रेच्या माध्यमातून गावोगावी जाऊन लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत. तसेच लोकांना सरकारकडून राबवण्यात येत असलेल्या योजनांची माहिती देत आहेत. सोबतच भूमिपूजनाचे कार्यक्रमही धडाक्यात घेत आहेत.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार बृजेंद्र सिंह मुंगवली विधानसभा मतदारसंघातील देवर्छी गावात गेले असताना ही घटना घडली. ते देवर्छी गावात आले असताना काही खोडसाळ प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांच्यावर खाजकुलीची पावडर टाकली. या घटनेचा एक व्हिडीओही समोर आला आहे. त्यात खाजकुली टाकण्यात आल्यानंतर मंत्रिमहोदर गावात आंघोळ करताना दिसत आहेत. तसेच त्यामध्ये कुणीतरी अंगावर खाजकुली टाकली असे ते सांगत असल्याचे ऐकू येत आहे.
दरम्यान, मंत्र्यांचे स्वागत करताना कुणीतरी फुलांच्या गुच्छासोबत खाजकुलीची पावडर त्यांच्यावर टाकली असावी. त्यानंतर मंत्रिमहोदय खाजेमुळे हैराण झाले.