नवी दिल्ली- भाजपाचे वाचाळवीर मंत्री ब-याचदा पक्षाला अडचणीत आणणारी विधानं करत असतात. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही या मंत्र्यांना आवरता येत नसल्यानं ब-याचदा विरोधकांच्या टीकेला सामोरं जावं लागतं. त्यातच आता भाजपाचे त्रिपुरातील नवनिर्वाचित मुख्यमंत्री बिल्पव देव यांनी एक अजब दावा केलाय. भारतात फार जुन्या काळापासून इंटरनेटचा वापर केला जातोय. महाभारताच्या काळात संजय दृष्टिहीन होता. परंतु युद्धाची सर्व हकीकत तो धृतराष्ट्रांना ऐकवत होता. हे इंटरनेट आणि टेक्नॉलॉजीमुळेच शक्य झालं आहे, त्या काळात सॅटेलाइटही अस्तित्वात होत्या, असं त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देव म्हणाले आहेत.त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देव यांनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यास एक महिना पूर्ण झाला. आगरतळ्यातल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही स्तुती केली. नरेंद्र मोदी देशातल्या डिजिटायझेशनला प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळेच देशातील प्रत्येक व्यक्ती इंटरनेटच्या माध्यमातून जोडली गेली आहे. मोदी लोकांमध्ये फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि ट्विटर वापरकर्ते म्हणूनही ओळखले जातात. भारतीय संस्कृती आणि परंपरा फार पूर्वापारपासून चालत आलेल्या आहेत. तेव्हापासूनच आपण टेक्नॉलॉजीचा वापर करतोय, असं म्हणत त्यांनी इंटरनेट महाभारत काळापासून असल्याचे सूतोवाच केले आहेत.तर गेल्या काही दिवसांपूर्वीही मोदींच्या मंत्रिमंडळातील अशाच एक मंत्र्यानं वादग्रस्त विधान केलं होतं. वानरांपासून माणसाच्या उत्क्रांतीचा डार्विन यांनी मांडलेला आणि सध्या जगमान्य असलेला मानवाच्या उत्क्रांतीचा सिद्धांत खोटा असल्याचे नवेच संशोधन मोदी सरकारमधील केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपालसिंह यांनी केले होते. अखिल भारतीय वैदिक संमेलनाच्या उद्घाटनासाठी ते औरंगाबादेत आले होते. त्यावेळीही बराच वाद झाला होता.
महाभारत काळातही इंटरनेट होते, त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांचा अजब दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2018 9:15 AM