नवी दिल्ली, दि. १० - युपीएच्या काळात विजय मल्ल्यांना वाचवलं गेल्याचा आरोप केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला आहे. विजय मल्ल्या प्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी गुरुवारी राज्यसभेत निवेदन दिलं त्यावेळी त्यांनी हा आरोप केला आहे.
जेव्हा विजय मल्ल्या परदेशात पळून गेले तेव्हा युपीएची सत्ता होती. विजय मल्ल्याला 2004 मध्ये बँकींगची सुविधा दिली गेली. ललित मोदी जेव्हा परदेशात गेले तेव्हादेखील काँग्रेस सत्तेत होती असं सांगत जेटलींनी काँग्रेसवर निशाणा साधला. सीबीआय या प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती अरुण जेटली यांनी दिली आहे.
काँग्रेसने अरुण जेटलींच्या आरोपाला उत्तर देत भाजपा सरकारने विजय मल्ल्याला पळून जाण्यास मदत केल्याचा प्रत्यारोप गुलाम नबी आझाद यांनी केला आहे. विजय मल्ल्या यांना कोणी कर्ज दिलं हा प्रश्न नाही तर त्यांनी देश सोडून जाण्यास का दिलं ? हा प्रश्न आहे. त्यांना देश सोडून जाण्याची परवानगी का दिली ? हा प्रश्न जयराम रमेश यांनी विचारला. दरम्यान राहुल गांधी यांनी सरकार आम्हाला बोलू देत नसल्याचा आरोप केला आहे. विजय मल्ल्या प्रकरणावर जर त्यांनी आम्हाला बोलू दिलं तर आम्ही बोलू, पण आम्हाला बोलू देतील की नाही ? शंका आहे. पंतप्रधानांना अशा मुद्यांवर चर्चा केलेली आवडत नाही असं राहुल गांधी बोलले आहेत.