संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पावर दोन्ही सभागृहात जोरदार चर्चा सुरू आहे. या चर्चेत आज भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार अनुराग ठाकूर यांनीही भाग घेताल. यावेळी त्यांनी काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या महाभारतावरील वक्तव्यावरून जोरदार फटकेबाजी केली. यावेळी लोकसभेत प्रचंड गदारोळ झाला.
राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर देत अनुराग ठाकूर म्हणाले, “रीलचे नेते बनू नका, खूप व्हायरल होते. रियल नेते बना, त्यासाठी सत्य बोलावे लागते. काही लोक अपघाती हिंदू आहेत आणि त्यांचे महाभारताचे ज्ञानही अपघाती आहे. राहुल गांधी यांनी कधी महाभारत वाचले तर सोडाच, पण पाहिलेही नसेल. कदाचित त्यांचे भाषण अंकल सॅम अथवा अंकल सोरोस यांनी लिहून दिलेले असावे.”
शशी थरूर यांच्या पुस्तकाचा उल्लेख -भाजप खासदार म्हणाले, “मी महाभारतावरील एक नवीन पुस्तक वाचले. ते पुस्तक त्यांच्याच पक्षाचे खासदार (शशी थरूर) यांनी लिहिले आहे. त्या पुस्तकाचे नाव आहे 'द ग्रेट इंडियन नोबेल'. राहुल गांधी यांना महाभारत आणि चक्रव्यूहची संपूर्ण माहिती हवी असेल, तर ते त्यांच्याशी संपर्क सादू शकतात. या कादंबरीत कोणत्या नेत्याला धृतराष्ट्र म्हटले आहे? कोणत्या पक्षाला कौरव म्हटले आहे? आणि कोण दुर्योधन आहे? हे राहुल गांधींना समजल्यानंतर त्यांच्यावर कारवाईही होऊ शकते. हे लोक केवळ पुस्तके दाखवतात. पण वाचत नाहीत. ते संविधान हलवत होते, मी विचारलं किती पानं आहेत, तेही सांगता आले नाही.”
ते पुढे म्हणाले, “या पुस्तकानुसार, ज्या पक्षाचे सर्वेसर्वा आपण आहात, त्याच पक्षाला कौरव म्हणण्यात आले आहे. मी पान क्रमांक 245 कोट करतो. यात देशाच्या पहिल्या पंतप्रधानांना धृतराष्ट्र म्हणण्यात आले आहे. यात पुढे आणीबाणीचीही चर्चा आहे.
"दुर्योधन, दु:शासन दुष्ट असू शकतात पण इमरजेन्सी नाही लावली" -अनुराग ठाकूर यांनी आणीबाणीचा उल्लेख करत इंदिरा गांधी यांचे नाव घेतले. ते म्हणाले, “मी ज्यांच्या बद्दल बोलत आहे, त्या देसाच्या पंतप्रधान होत्या आणि एका नेत्याच्या आजी होत्या. अनुराग पुढे म्हणाले, दुर्योधन, दु:शासन दुष्ट असू शकतात पण त्यांनीही कधी आणीबाणी लावली नव्हती.”