उचाना कलां : महाराष्ट्रासोबतच हरयाणा विधानसभा निवडणुकीचे कल हाती येत आहेत. हरयाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल जसजसे हाती येऊ लागले आहे. तसतसे अनेकांनी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सध्या निकालांच्या आकडेवारीनुसार, हरयानामध्ये भाजपा 45, काँग्रेस 33 आणि इतर 12 जागांवर आघाडीवर आहे.
यातच, जननायक जनता पार्टीचे अध्यक्ष दुष्यंत चौटाला यांनी हा निकाल त्रिशंकू लागेल अशी शक्यता वर्तविली आहे. दुष्यंत चौटाला म्हणाले, "40 जागांचा टप्पा भाजपा किंवा काँग्रेस गाठू शकणार नाही. सत्तेची चावी जननायक जनता पार्टी जवळ राहील. आमची सरळ लढत 26-27 जागांवर होत आहे."
याचबरोबर, हरयाणातील जींदमध्ये माध्यमांशी बोलताना दुष्यंत चौटाला यांनी सांगितले की, हरायाणातील लोकांचे प्रेम मिळत आहे. बदलाचे संकेत दिसत आहेत. भाजपाचा 75 जागांवर विजय मिळविण्याचा दावा फोल ठरला आहे, त्यामुळे आता यमुना पार करण्याची वेळ आली आहे.
दरम्यान, उचाना कलां मतदारसंघात दुष्यंत चौटाला आणि भाजपाच्या उमेदवार प्रेमलता यांच्यात लढत आहे. पहिल्या फेरीत दुष्यंत चौटाला आघाडीवर आहेत. दुष्यंत चौटाला यांना 18,445 मते मिळाली आहेत. तर प्रेमलता यांना 8025 मते मिळाली आहेत.