नवी दिल्ली : हवामान खात्याने अंदाज वर्तविल्यानुसार सोमवारी संध्याकाळी धुळीचे वादळ चंदीगड, पंजाब, हरयाणा आणि राजस्थानमध्ये धडकले. त्यानंतर रात्री या वादळाचा तडाखा दिल्ली आणि उत्तर प्रदेशातही बसला. या वादळामुळे दिल्ली आणि उत्तर प्रदेशात वेगाने वारे वाहत असून, अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे.
धुळीचे पर्वत अंगावर कोसळावे अशा आकारात आलेल्या वादळाने अनेक जिल्ह्यांमध्ये क्षणात अंधार करुन टाकला. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊसही झाला. तसेच वादळी वा-यामुळे अनेक ठिकाणी वीजही गेली होती. राजस्थानात आणि हरयाणात याचा सर्वाधिक फटका बसला. दरम्यान, रात्री हे वादळ दिल्ली आणि उत्तर प्रदेशपर्यंत पोहोचले. या वादळामुळे वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसोबत मुसळधार पावसाचा तडाखाही उत्तर भारतात बसला.