लखनौ - उत्तर प्रदेशात आगामी काही महिन्यांत विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे. त्यामुळे, गेल्या 5 वर्षात योगी सरकारने केलेल्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचं काम भाजपा नेत्यांकडून होत आहे. तर, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही सार्वजनिक ठिकाणी, लोकांमध्ये आपला अधिक वेळ खर्ची करत आहेत. रविवारी गोरखनाथ मंदिर परिसरात फिरत असताना एका महिला कॉन्स्टेबलला योगींनी पाहिले. त्यानंतर, संबंधित पोलीस अधिकाऱ्याला महत्त्वाची सूचना केली.
योगी आदित्यनाथ रविवारी मंदिर परिसरात फिरत असताना, महिला कॉन्स्टेबल आपल्या लहानग्या बाळासह ड्युटीवर तैनात होती. योगींनी त्या महिलेला पाहिल्यानंतर त्यांनी तिच्याजवळील बाळ हातात घेतले. त्या, बाळाला गोंजारत महिला कॉन्स्टेबलला ड्युटीसंदर्भात विचारणा केली. त्यानंतर, संबंधित पोलीस अधिकाऱ्याला महिला कॉन्स्टेबलला रात्रीची ड्युटी का दिली, अशी विचारणा करत, दिवसाची ड्युटी देण्याचे निर्देश योगी आदित्यनाथ यांनी दिले.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी जनता दरबारमध्ये 225 लोकांच्या तक्रारी आणि समस्या जाणून घेतल्या. तसेच, या समस्यांवर समाधान करत सोडविण्याचे आश्वासनही दिले. जनता दरबार झाल्यानंतर योगींनी हिंदू युवा वाहिनी, भारतीय जनता पार्टी आणि मंदिर ट्रस्टशी संबंधित लोकांच्या गाठीभेटी घेत त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या.
योगींच्या खांद्यावर मोदींचा हात
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या खांद्यावर हात ठेवलेला फोटो नुकताच व्हायरल झाला होता. उत्तर प्रदेशमध्ये पुढच्या काही महिन्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या फोटोची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. तसेच या छायाचित्रावरून विरोधी पक्षांनी खूप टीकाही केली होती. मात्र, मोदींनी योगींच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना नेमकं काय सांगितलं, असेल असा प्रश्न सर्वांना पडला होता.