नवी दिल्ली - राहुल गांधींचे निकटवर्तीय आणि काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज काँग्रेस सोडण्याची घोषणा केली आहे. आता ज्योतिरादित्य शिंदे हे भाजपामध्ये प्रवेश करणार हे जवळपास निश्चित झाले आहे. दरम्यान, गेल्या काही काळापासून काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपाकडे वळवण्यात गुरजातमधील एका बड्या राजघराण्याने महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगण्यात येत आहे.
मध्य प्रदेशमधील भाजपाची १५ वर्षांची सत्ता उलथवून गतवर्षी काँग्रेसने २०१८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला होता. त्या विजयामध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. दरम्यान, मुख्यमंत्रिपदी शिंदेंऐवजी कमलनाथ यांची निवड पक्षश्रेष्ठींनी केली होती. तेव्हापासून ज्योतिरादित्य शिंदे हे नाराज होते. तसेच त्यांनी काही वेळा आपली नाराजी उघडसुद्धा केली होती. दरम्यान, नाराज असलेल्या शिंदे यांनी भाजपाच्या जवळ आणण्यात गुजरातमधील बडोदा येथील गायकवाड राजघराण्याने महत्त्वाची भूमिका बजावली.
ज्योतिरादित्य शिंदे यांचे सासर बडोदा राजघराण्यात आहे. याच राजघराण्याच्या महाराणींनी ज्योतिरादित्य शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील भेटीचे नियोजन केले. त्यांच्या पुढाकारानेच शिंदे आणि भाजपा यांच्यातील चर्चा यशस्वी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मध्य प्रदेशमधील राजकीय परिस्थितीबाबत रणनीती आखण्यासाठी सोमवारी अमित शाह यांच्या घरी बैठक झाली होती. या बैठकीत भाजपाध्यक्ष अमित शाह, शिवराज सिंह चौहान, नरेंद्र सिंह तोमर आणि नरोत्तम मिश्रा सहभागी झाले होते. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्यात मध्यस्थी करण्यामध्ये बडोदा राजघराण्याच्या महाराणी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनीच शिंदे यांना भाजपाशी संपर्क साधण्यात राजी केले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिंदे यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी नरेंद्रसिंह तोमर यांच्यावर सोपवली. तोमर शिंदे यांच्या घरी गेले. तिथेच पुढील रणनीती ठरली.
संबंधित बातम्या
'बंडखोरी'ला मोठा इतिहास; ज्योतिरादित्यांच्या आजीनेही काँग्रेस सरकार पाडलेले
राजीनामा नाही, काँग्रेसने हकालपट्टी केली; ज्योतिरादित्यांवर ठेवला गंभीर आरोप
...म्हणून आजचा दिवस ज्योतिरादित्य सिंधियांसाठी खास; लवकरच धरणार भाजपचा 'हात'
आणीबाणीने कुटुंब फोडलेले, ज्योतिरादित्य सिंधिया आज जोडणार; राजमातेचे स्वप्न पूर्ण करणार
दरम्यान, शिंदे यांच्या भाजपाशी चाललेल्या चर्चेची कुणकूण लागल्यानंतर काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी तातडीने पावले उचण्यास सुरुवात केली. शिंदे यांच्याशी चर्चा करण्यासाठी सचिन पायलट यांना पाठवण्यात आले. मिलिंद देवरा यांच्याशीसुद्धा चर्चा घडवून आणण्यात आली. मात्र त्यातून काही तोडगा निघाला नाही.