संतोष ठाकूर नवी दिल्ली : शुक्रवारची सकाळ सरकारची महत्वाची मंत्रालये असलेल्या शास्त्री भवनसाठी विशेष होती. उर्जा मंत्रालयाच्या ई-कार योजनेनुसार माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना नियमित कारऐवजी ई-कार दिली जाणार होती. वेळेप्रमाणे जावडेकर आले आणि आपल्या ई-कारमध्ये बसले. परंतु, स्टीअरींग सांभाळत ते पाच मिनिटे तेथेच बसून राहिले. या दरम्यान त्यांंनी कारमध्ये असलेल्या उर्जा मंत्रालयाच्या ई-कार तज्ज्ञांसोबतच आपल्याच मंत्रालयाचेअतिरिक्त सचिव ए. के. तिवारी यांच्याकडून ई-कारबद्दल माहिती घेतली. गंमत म्हणजे त्यांच्या मंत्रालयाचे संयुक्त सचिव विक्र म सहाय आणि ए. के. तिवारी यांनी एक दिवस आधीच ही ई-कार चालवण्याचा अनुभव घेतला होता. त्या कारणामुळे जावडेकर हे माहिती करून घेण्याचा प्रयत्न करीत होते की, नियमित कार आणि या ई-कारमध्ये काय फरक आहे? त्यांना मग हे सांगण्यात आले की, ही कार सुरू झाल्यानंतर एक किंवा दोन झटके घेते व त्यानंतर चालते. हे ऐकल्यावर जावडेकर यांनी कार सुरू केली. तीन झटक्यांनंतर कारने वेग घेतला व त्यानंतर जावडेकर कार घेऊन गेले.
या कार्यक्रमास पीआयबीचे महासंचालक कुलदीप धतवालिया, डीएव्हीपीचे महासंचालक सत्येंद्र प्रकाश व दूरदर्शनचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते. आपला ई-कार प्रवास सुरू करण्याच्या आधी जावडेकर चर्चेत म्हणाले की, केंद्र सरकार येत्या दिवसांत आपल्या सगळ््या पाच लाख कारचे रुपांतर ई-कारमध्ये करील. दिल्ली आणि ज्या शहरांत वाहनांची संख्या जास्त आहे तेथे ई-कार हाच पर्याय आहे. विशेषत: पर्यावरणाचे संरक्षण करण्याची गरज असताना व प्रदूषणाने दिल्लीला वेढलेले असताना ई-कार महत्वाच्या आहेत.
जावडेकर म्हणाले, प्रदूषणाच्या प्रश्नावर दिल्ली सरकार जे राजकारण करीत आहे ते योग्य नाही. ते सरकार कधी हरयाणा तर कधी उत्तर प्रदेश सरकारला दोषी ठरवत आहे. दिल्ली सरकार हे सांगू शकेल का की त्याने ईस्टर्न पेरीफेरल वेसाठी ३५ कोटी रूपये का नाही दिले? शेवटी न्यायालयाला त्याने एक हजार कोटी रूपये द्यावेत, असा आदेश का द्यावा लागला? जावडेकर म्हणाले, ही वेळ दोषारोपण करण्याची नाही. दिल्ली आणि देशाला एकत्र येऊन प्रदूषणापासून वाचण्याची गरज आहे.केंद्राचे ई-वाहन धोरणाला प्रोत्साहनआमच्या सगळ्यांची ही सामूहिक जबाबदारी आहे की आम्ही प्रदूषणावर प्रहार करावा. आपल्या सवयींत बदल करावा, इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन द्यावे. केंद्र सरकार ई-वाहन धोरणाला प्रोत्साहन देण्यासोबतच ई-चार्जिंगबाबत मोठे पाऊल उचलत आहे, असे जावडेकर या वेळी म्हणाले.