अहमदाबाद : मुंबई, दिल्लीसह अनेक शहरांमध्ये सध्या वाहतूक पोलिस विभाग हायटेक झाला आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्य़ा वाहनचालकांचे फोटो चलनावर छापून त्यांच्या अधिकृत पत्त्यावर पाठविले जातात. असाच प्रकार अहमदाबादमधील एका तरुणाच्या बाबतीत घडला आहे. मात्र, त्याने ही चलनाची रक्कम मोठ्या आनंदाने भरली आहे. तसेच ट्विटरवर त्याने पोलिसांचे आभारही मानले आहेत.
झाले असे, की या तरुणाच्या घरी शनिवारी वाहतूक विभागाकडून चलन पाठविण्यात आले. यामध्ये त्याच्यावर 100 रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. या ई-चलनावर त्याचा नियम मोडतानाचा फोटो होता. हे चलन त्याच्या घरच्यांच्या हातात पडले आणि खऱ्या नाट्यमय घडामोडींना वेग आला, कारण या चलनावर त्या तरुणासोबत एका युवतीचाही फोटो होता आणि ही युवती त्याच्या मोटारसायकलवर मागे बसली होती.
घरच्यांनी या तरुणाला चांगलेच फैलावर घेतले. आत बिंग फुटलेच आहे तर त्या तरुणाने घाबरतच खरेखरे आई-वडिलांना सांगितले. या मुलीवर प्रेम असल्याची कबुली त्यांनी घरच्यांसमोर दिली. तरुणाच्या घरच्यांनी थेट मुलीच्या घरच्यांशी संपर्क साधत त्यांना आपल्या घरीही बोलावले. यानंतर दोन्ही परिवारांनी समजुतदारपणा दाखवत धुमधडाक्यात लग्न लावून देण्याचे ठरविले.
पोलिस आयुक्तांकडून रिट्विटया तरुणाने अहमदाबाद पोलिसांचे आभार मानत ही घडामोडही ट्विटरवर शेअर केली. यावर अहमदाबादचे प्रशासन विभागाचे पोलीस आयुक्त विपुल अग्रवाल यांनी 'जोर का झटका धीरे से' या टॅगलाईनखाली रिट्विट केले. या तरुणाने खासगी माहिती दिली नसली तरीही त्याच्या मित्रांनी सांगितले की हा तरुण घरच्यांना प्रेयसीबद्दल सांगायला घाबरत होता. परंतू पोलिसांनी त्याचा हा प्रश्न 100 रुपयांत सोडविला.