बरेली : शेतकरी हे देशाची शान आहेत, असे मोठ्या अभिमानाने सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आल्याचे स्पष्ट केले. हे लक्ष्य कठीण नसून राज्य सरकारांना त्यासाठी संकल्प करावा लागेल, असे ते रविवारी येथे ‘किसान कल्याण’ रॅलीला संबोधित करताना म्हणाले. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला जास्तीत जास्त फायदेशीर दर देण्यासाठी आंबेडकर जयंतीला ई- मार्केटिंग योजना सुरू करण्याची घोषणाही त्यांनी केली. या योजनेमुळे शेतकऱ्यांना जवळच्या बाजारपेठेचे दर कळू लागतील.ज्या बाजारपेठेत जास्त दर तेथे त्यांना माल विकता येईल. शेतकऱ्यांची सर्वाधिक लोकसंख्या पाहता मोदींनी शेतीसंबंधी योजनांवर भर दिल्याचे मानले जाते. कृषी योजनांसाठी ५० हजार कोटीपुढील वर्षी उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुका पाहता या रॅलीला अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे. बुंदेलखंड भागात पाच-पाच नद्या असून, या भागासह अन्यत्रही पाण्याच्या संकटापासून मुक्ती मिळवता येऊ शकते.त्यासाठी प्रामाणिक संकल्प असावा. शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने पंतप्रधान कृषी सिंचन योजना, मृदा आरोग्य कार्ड योजना, पंतप्रधान पीक विमा आदींसाठी ५० हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे, असे ते म्हणाले. मोदींना आठवला बरेलीचा ‘झुमका’मोदींनी ‘झुमका गिरा रे’ या गाण्याचा ठेका लावत बरेलीचे स्मरण करवून देताच रॅलीत एकच जल्लोष झाला. ‘मेरा साया’ या चित्रपटातील सुनील दत्त- साधना यांच्यावरील हे गाणे एकेकाळी गाजले होते. मी यापूर्वी कधीही येथे आलो नाही. मात्र, ‘झुमका गिरा रे बरेली की बाजार में’ हे गाणे मी निश्चितच ऐकले आहे, असे त्यांनी सांगितले. मी बरेली- वाला- सुरमाबद्दल ऐकले आहे. ते डोळ्याला नवी दृष्टी देते. मी लहान असताना पतंग उडविण्यासाठी बरेलीच्या मांजाला खूप मागणी होती. पतंग जेव्हा उंच उडायचा तेव्हा वापरलेला दोरा म्हणजे बरेलीचा मांजाच आहे, हे ठरलेले समीकरण होते, असे त्यांनी सांगताच जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना प्रतिसाद देण्यात आला. (वृत्तसंस्था)नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाचे वर्णन उद्या माझी परीक्षा आहे, असे केले. त्यांनी रविवारी ‘मन की बात’मध्ये मंडळाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे भाषण दिले. सचिन तेंडुलकर आणि विश्वनाथ आनंद यांच्यासारख्या आयकॉनकडेही ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. देशातील १२५ कोटी लोक माझी परीक्षा घेत असून, मी पूर्ण क्षमतेने सामोरा जात आहे. मंगळवारपासून दहावी आणि बारावीची परीक्षा सुरू होत असताना विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने तोंड द्यावे, असे त्यांनी सूचित केले. विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवत परीक्षा द्यावी. कोणतीही घाई न करता शांत आणि मोकळ्या मनाने परीक्षा द्यावी. पालकांनी विद्यार्थ्यांवर दबाव आणू नये, असे सांगतानाच त्यांनी आज सोमवारी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशवासीयांचे डोळे लागले असल्याचे तसेच त्याचे विश्लेषण केले जाणार असल्याचे नमूद केले. मित्रांनो तुमची परीक्षा सुरू झाली आहे. माझीही परीक्षा आहे. देशवासी माझी परीक्षा घेत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. सचिन, आनंद ‘आयकॉन’सचिन, आनंद तसेच भारतरत्नप्राप्त वैज्ञानिक सीएनआर राव तसेच आध्यात्मिक गुरू मुरारी बापू यांचे संदेश या भाषणाच्या वेळी ऐकविण्यात आले. तुम्हालाही माझ्यासारखे सुदृढ वाटायला हवे. उद्या माझी परीक्षा होत असून त्यानंतर तुमची. तुम्ही सर्व उत्तीर्ण झाले तर देश उत्तीर्ण होईल. यश आणि अपयशाचा ताण न घेता मोकळ्या मनाने तसेच सकारात्मक आणि तणावमुक्त राहूनच दबावाला सामोरे जावे, असे त्यांनी नमूद केले.
शेतकऱ्यांसाठी ई-मार्केटिंग योजना
By admin | Published: February 29, 2016 3:18 AM