नवी दिल्ली : महाराष्ट्रातील ५४ नव्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांसह १० राज्यांमधील आणखी १७७ बाजार समित्या (मंडी) सोमवारी ‘ई-नाम’ या शेतमालाच्या देशाव्यापी आॅनलाइन बाजारपेठेशी जोडल्या गेल्या. यामुळे आता ‘ई-नाम’मध्ये देशभरातील ९६२ मंडईतील शेतमालाची आॅनलाईन खरेदी-विक्री करता येऊ शकेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तंत्रज्ञानाचा हा नवा पर्याय खुला झाला आहे.केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी आॅनलाइन कार्यक्रमात या नव्या बाजार समित्यांना ‘ई-नाम’ पोर्टलशी जोडून घेतले. या ई-बाजारपेठेला अधिक बळकटी देण्यावर तोमर यांनी भर दिला. आणखी १५ राज्यांमधील आणखी ४१५ बाजार समित्या १५ मेपर्यंत सामील झाल्यावर ‘ई-नाम’वरील मंड्यांची संख्या एक हजाराहून अधिक होईल व ‘एक देश, एक बाजारपेठ’ हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.प्रगत माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालासाठी देशव्यापी बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी केंद्र सरकारने एप्रिल २०१६ पासून ‘ई-नाम’ हे पोर्टल सुरु केले.150 प्रकारचा अन्नधान्य, भाजीपाला, फळे, यासह शेतमाल या बाजारात विकला जातो.1005 उत्पादक संस्थाही (एफपीओ) शेतकऱ्यांनी स्थापन केलेल्या या बाजारपेठेत सामील आहेत.7.92 कोटी रुपयांची त्यांनी आतापर्यंत उलाढाल केली आहे.
‘ई-नाम’ पोर्टल : आणखी ५४ बाजार समित्या ऑनलाईन, शेतमालाची देशव्यापी बाजारपेठ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 5:31 AM