"निवडणुकीत प्रत्येक पक्ष एकाच चिन्हावर लढतो पण भाजपा मात्र कमळ आणि..." काँग्रेसची खोचक टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 03:16 PM2024-03-12T15:16:34+5:302024-03-12T15:16:54+5:30
Congress Criticize BJP: नंदूरबार- निवडणुकीत एका पक्षाला एकच चिन्ह असते पण भारतीय जनता पक्ष दोन चिन्हांवर लढत आहे, एक चिन्ह कमळ आहे तर दुसरे चिन्ह वॉशिंग मशिन आहे, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केली.
नंदूरबार- निवडणुकीत एका पक्षाला एकच चिन्ह असते पण भारतीय जनता पक्ष दोन चिन्हांवर लढत आहे, एक चिन्ह कमळ आहे तर दुसरे चिन्ह वॉशिंग मशिन आहे. आणखी दोन फ्रंटल आहेत ते म्हणजे ईडी व सीबीआय. भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निती व नियत ही समाजात फूट पाडण्याची आहे. भाजपाच्या या नितीविरोधात काँग्रेस पक्ष मात्र भारत जोडो व न्याय यात्रेच्या माध्यमातून समाजाला न्याय देण्याचे काम करत आहे, असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे मीडिया विभागाचे अध्यक्ष जयराम रमेश यांनी सांगितले.
नंदूरबार येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना जयराम रमेश यांनी भारत जोडो न्याय यात्रेची माहिती दिली. ते पुढे म्हणाले की, १४ जानेवारी २०२४ ला मणिपूरमधून भारत जोडो न्याय यात्रा सुरु झाली व आज ५९ व्या दिवशी महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रा व पांच न्याय याबद्दल जनतेला माहिती दिली. आतापर्यत तीन न्याय संदर्भात काँग्रेस पक्षांने गॅरंटी दिली आहे. ही गॅरंटी एका व्यक्तीची नाही तर ही पक्षाची गॅरंटी आहे. एमएसपीला कायदेशीर करणे, तरुणांना पाच न्याय देण्यासंदर्भात गॅरंटी दिली तर सामाजिक न्याय संदर्भात जातनिहाय जनगणना करणे व आरक्षणाची ५० टक्के मर्यादा हटवण्याची गॅरंटी दिली आहे. धुळ्यात महिला संमेलनात महिला न्याय संदर्भातील गॅरंटी जाहीर केली जाईल तर १७ तारखेला शिवाजी पार्कवरील सभेत इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत कामगार न्यायाच्या गॅरंटीबद्दल घोषणा केली जाईल.
काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले की, महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा सुरु आहे, सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येऊन लढण्याचा निर्णय आहे. जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीची चर्चा असून कोणतेही मतभेद नाहीत. वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा सुरु आहे व बाळासाहेब थोरात हेही त्यांच्याशी चर्चा करत आहेत. १७ तारखेनंतर मविआचा जागा वाटपाचा फार्म्युला जाहीर केला जाईल.