ऑनलाइन लोकमत
मेलबर्न, दि. 18 - देशात वाढत चाललेली बेरोजगारी कमी करण्यासाठी ऑस्ट्रिलेयाने आपला व्हिसा प्रोग्राम रद्द केला आहे. पण यामुळे ऑस्ट्रेलियात काम करत असलेल्या तब्बल 95 हजार परदेशी कर्मचा-यांवर बेरोजगार होण्याची वेळ येणार आहे. या कर्मचा-यांमध्ये जास्त संख्या भारतीयांची आहे. या व्हिसा प्रोग्रामला 457 व्हिसा म्हणून ओळखलं जातं. या व्हिसाअंतर्गत कंपन्यांना कुशल रोजगारात ऑस्ट्रेलियन कर्मचा-यांची कमतरता भासत असल्यास चार वर्षांसाठी परदेशी कर्मचा-याची नियुक्ती करण्याची परवानगी मिळते.
"आम्ही एक इमिग्रेशन देश आहोत, पण यामुळे वास्तव बदलणार नाही. देशातील नोक-यांमध्ये ऑस्ट्रेलियन कर्मचा-यांना प्रथम संधी दिली गेली पाहिजे. यासाठीच आम्ही 457 व्हिसा, ज्याच्या माध्यमातून तात्पुरत्या स्वरुपासाठी परदेशी कर्मचारी ऑस्ट्रेलियात येतात तो बंद करत आहोत", असं ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांनी सांगितलं आहे.
हा व्हिसा ज्यांच्याकडे आहे त्यांच्यामध्ये भारतीयांची संख्या जास्त आहे. भारतानंतर ब्रिटन आणि चीनचा क्रमांक आहे. "457 व्हिसाला आता रोजगारासाठी पासपोर्ट होण्याची परवानगी मिळणार नाही, हे रोजगार ऑस्ट्रेलियाच्या नागरिकांना मिळाले पाहिजेत", असंही ते बोलले आहेत.
मिळालेल्या आकडेवारीनुसार 30 सप्टेंबरपर्यंत ऑस्ट्रेलियामध्ये एकूण 95,757 परदेशी नागरिक 457 व्हिसा अंतर्गत काम करत होते. आता हा व्हिसा कार्यक्रम रद्द करत दुसरा व्हिसा कार्यक्रम आणला जाणार आहे. या नव्या व्हिसा कार्यक्रमात नवे निर्बंध लागू करण्यात येतील.
"नव्या व्हिसा कार्यक्रमात हे नक्की केलं जाईल की ज्या क्षेत्रामध्ये खरोखर कुशल कामगारांची कमतरता आहे तिथेच परदेशी नगारिकांना नोकरी मिळावी. फक्त आणि फक्त परदेशी नागरिकांना नोकरी देणं जास्त सोपं आहे या कारणासाठी त्यांना नोकरी न देता तिथे ऑस्ट्रेलियान नागरिकालाच नोकरी मिळेल याची काळजी घेतली जाईल", असं पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांनी स्पष्ट केलं आहे. पपंतप्रधान माल्कम टर्नबुल यांनी भारत दौ-यावरुन परतल्यानंतर ही घोषणा केली आहे.