देशात 2014 नंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. 10-12 वर्षांपूर्वी मोबाइल फोन वारंवार हँग होत होते. आपण कितीही बटन दाबा अथवा स्वॅप करा, ते हँगच रहायचे. अशीच स्थिती तेव्हाच्या सरकारचीही होती. तेव्हा अर्थव्यवास्था असो अथवा इतर कोणतेही क्षेत्र असो, नेहमी हँगच राहत होते. परिस्थिती एवढी बिकट झाली होती की, चार्ज करून आणि बॅटरी बदलूनही काही उपयोग होत नव्हता. शेवटी 2014 नंतर लोकांनी फोनच बदलून टाकला, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता मागच्या यूपीए सरकारवर जोरदार निशाना साधला आहे.
राजधानी दिल्लीतील भारत मंडपम येथे 7 व्या भारतीय मोबाईल काँग्रेस 2023 दरम्यान देशभरातील काही निवडक संस्थांमध्ये 100 नव्या 5G लॅबचे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधान मोदी बोलत होते. भारतीय मोबाईल काँग्रेस हा आशियातील सर्वात मोठा दूरसंचार, मीडिया आणि औद्योगिक विकास मंच आहे. दिल्लीतील प्रगती मैदानजवळी भारत मंडपम सभागृहात 27 ते 29 ऑक्टोबर या तीन दिवसांसाठी याचे आयोजन करण्यात आले आहे. मोदी म्हणाले, आता जग 'मेड इन इंडिया' फोनचा वापर करत आहे. 2014 तारीख नव्हे तर बदल आहे.मोदी म्हटले, जेव्हा आपण भविष्यासंदर्भात बोलतो, तेव्हा पुढील दशक किंवा शतकासंदर्भात भाष्य करतो. मात्र, टेक्नॉलॉजी विकासाच्या माध्यमातून आता ह्या गोष्टी काही दिवसांतच पूर्ण होतात. येणारा काळ निश्चितच वेगळा आहे, देशाची भावी पिढी देशाच्या टेक इंडस्ट्रीचे नेतृत्त्व करत आहे. जगभरातील देशांच्या तुलनेत भारतात 5 जी टेक्नॉलॉजीचा विस्तार गतीने होत आहे. तरीही आपण थांबलो नाहीत. याउलट 6 जी च्या क्षेत्रातही जगाचे नेतृत्व करण्याच्या दिशेने भारताची वाटचाल सुरू आहे.