श्रीनगर- गुलमर्ग येथिल नरबळ येथे चेन्नईतील तिरूमणी नावाच्या तरूणाचा आंदोलनकर्त्यांचा दगडफेकीत मृत्यू झाला होता. प्रवाशांना घेऊन जाणारी बस श्रीनगर-गुलमर्ग मार्गावरून जात असताना तिरूमणीचे वडील राजबली यांना काही मीटर अंतरावर रस्त्याच्याकडेला असलेले 30-40 लोक दिसले होते. त्यावेळी दगडफेक होईल याचा अंदाजही नव्हता. अचानक सगळीकडून दगडं यायला सुरूवात झाली. आम्ही मदतीसाठी आरडाओरडाही केला. त्याचवेळी तिरूमणीने इअरफोन्स लावले होते, त्यामुळे मी ओरडत असल्याचा आवाज त्याच्यापर्यंत पोहचलाच नाही, असं तिरूमणीचे वडील राजबली यांनी सांगितलं. आंदोलनकर्त्यांच्या दगडफेकीत तिरूमणीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
22 वर्षीय तिरूमणी सेलवनचा मृतदेह मंगळवारी इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाने दिल्लीत आणण्यात आला. त्यानंतर चेन्नईसाठी मृतदेह रवाना करण्यात आला. गाणं ऐकण्यात मग्न असलेल्या तिरूमणीला वडिलांचा आवाज ऐकु आला नाही आणि त्यामुळे दगडफेक करणाऱ्यांच्या निशाण्यावर येऊन त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी या घटनेचा निषेध केला आहे. त्यांनी तिरूमणीच्या कुटुंबाची भेटही घेतली. 'या घटनेने माझी मान शरमेने झुकली आहे,' अशी प्रतिक्रिया जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी व्यक्त केली होती.