अहमदाबाद - एकीकडे कोरोनाचे मोठे संकट आलेले असताना देशाला इतर अनेक संकटांचाही सामना करावा लागत आहे. कोरोनादरम्यान देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यावर चक्रीवादळ येऊन गेल्यानंतर आता देशातील काही भागात भूकंपाचे धक्के बसत आहेत. आज गुजरातमध्येभूकंपाचे तीव्र धक्के जाणवल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
संपूर्ण गुजरातमध्ये भूकंपाचे हे धक्के जाणवले असून, रिक्टर स्केलवर त्याची तीव्रता ५.५ एवढी नोंदली गेली आहे. या भूकंपाचे केंद्र कच्छमधील भचाऊ येथे जमिनीपासून १० किमी खाली असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, या भूकंपामुळे रहिवाशांमध्ये भीती निर्माण झाली आहे. तसेच लोक घरातून बाहेर पळाले आहेत.
भूकंपाचे केंद्र कच्छमध्ये असले तरी त्याचे धक्के गुजरातच्या अनेक भागात जाणवले, अहमदाबादमध्येसुद्धा लोक भीतीने घराबाहेर पळाल्याचे दिसून आले.