नवी दिल्ली : दिल्लीसह उत्तर भारताच्या काही भागात रविवारी सायंकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. त्यानंतर पुन्हा सोमवारी सकाळी दिल्ली-एनसीआर परिसरात भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता 3.7 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली.
सोमवारी सकाळी सहा वाजून 28 मिनिटांनी पश्चिम उत्तर प्रदेशमधील मेरठच्या काही भागात भूकंपाचे धक्के बसल्याची प्राथमिक माहिती मिळाली. त्यानंतर दिल्ली-एनसीआर सुद्धा धक्के जाणवल्याचे काही प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. याशिवाय, भुकंपामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान किंवा जीवितहाणी झाली नसल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, दिल्लीसह उत्तर भारताच्या काही भागात रविवारी सायंकाळी 4 वाजून 37 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 3.8 मोजली गेली. हरियाणातील झज्जर येथे भूपृष्ठापासून 10 किलोमीटर खोलीवर या भूकंपाचे केंद्र होते. दिल्लीला लागून असलेल्या नोएडा, गुरुग्राम, फरिदाबादसारख्या भागांना भूकंपाचे झटके जाणवले.