नवी दिल्ली : बिहार, पश्चिम बंगालसह ईशान्य भारतात बुधवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 5.4 इतकी रिश्टर स्केलवर मोजण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील किशनगंज, पूर्णिया आणि कटिहार परिसरात भूकंपाचे धक्के बसले. तर, पश्चिम बंगाल, आसाम, नागालँडसह ईशान्य भारतातही या भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सांगण्यात येत आहे. या भूंकपामुळे अनेक ठिकाणी नागरिकांची धावपळ सुरु झाली. तर, अनेकजण घरातून बाहेर येऊन रस्त्यावर थांबले. मात्र, या भूकंपामुळे अद्याप कोणतेही नुकसान झाले नसल्याचे समजते.
दरम्यान, आज पहाटे जम्मू-काश्मीर आणि हरियाणाच्या अनेक भागांना भूकंपाचा धक्का बसला. जम्मू-काश्मीरमध्ये सकाळी 5 वाजून 15 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर 4.6 इतकी या भूकंपाची तीव्रता होती. तर, हरियाणाच्या झज्जरमध्ये सकाळी 5 वाजून 43 मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले. 3.1 रिश्टर स्केल इतकी या भूकंपाची तीव्रता होती.