नवी दिल्ली- दिल्ली, एनसीआरसह उत्तराखंडला जोरदार भूकंपाचे हादरे बसले आहेत. भूकंपाचा केंद्रबिंदू उत्तराखंडमधल्या रुद्रपयाग येथे 30 किमी खोलवर दाखवण्यात आला आहे. या भूकंपाची तीव्रता 5.5 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा आणि दिल्ली/एनसीआरला बुधवारी रात्री 8.50 मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसल्यानं लोक घरातून बाहेर आले आहेत. देशातील अनेक भागात या भूकंपाचे हादरे जाणवले आहेत. भूकंपात अद्याप कोणतीही जीवितहानी व वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. उत्तराखंडमधल्या बागेश्वर आणि हरिद्वारला भूकंपाचे जास्त तीव्रतेचे धक्के बसले. उत्तर प्रदेशमधल्या सहारनपूरलाही या भूकंपाचे हादरे बसले आहेत. भूकंपाचे धक्के बराच वेळ जाणवले आहेत. दिल्लीत संध्याकाळी उशिरापर्यंत काम करणा-या लोकांनाही या भूकंपाचे हादरे जाणवले. एनसीआरमध्ये काही कर्मचारी रस्त्यावर आले होते.