Earthquake in Delhi: राजधानी दिल्ली आणि NCR परिसरात आज(दि.3) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाच्या धक्क्यांमुळे बराच वेळ जमीन हादरत होती, यावेळी घाबरुन लोक घरातून आणि ऑफिसमधून बाहेर पडले. राष्ट्रीय भूकंपविज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता 4.6 रिश्टर स्केल होती.
राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या म्हणण्यानुसार, भूकंपाचे दोन धक्के जाणवले आहेत. भूकंपाचा पहिला हादरा दुपारी 2.25 वाजता जाणवला, त्याची तीव्रता 4.6 इतकी होती आणि भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये पृथ्वीच्या 10 किमी खोल होता.
अर्ध्या तासाच्या आत दुसरा भूकंप झाला, ज्याची तीव्रता 6.2 होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू भूपृष्ठापासून 5 किलोमीटर खोलीवर होता, त्यामुळे त्याचे धक्के खूप वेगाने आणि दूरवर जाणवले.
दरम्यान, गेल्या काही काळापासून दिल्लीसह उत्तर भारतात सातत्याने भूकंपाचे झटके जाणवत आहेत. यामुळे लोकांध्ये भीतेचे वातावरण आहे. आजच्या भूकंपामुळे जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. सध्या प्रशासन यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे.