Earthquake in India :भारतात येणाऱ्या भूकंपाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या चार वर्षांत देशभरात 300 हून अधिक भूकंप झाले आहेत. 2020 ते नोव्हेंबर 2023 पर्यंत एकूण 310 भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. केंद्र सरकारने ही आकडेवारी जाहीर केली आहे. या वर्षी, म्हणजे 2023 मध्ये या भूकंपात लक्षणीय वाढ झाली आहे.
सरकारी आकडेवारीनुसार 2023 मध्ये 124 वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. 97 भूकंपांची तीव्रता 3.0 ते 3.9 दरम्यान होती, तर 4.0 ते 4.9 तीव्रतेचे 21 भूकंप आले. तसेच, चार वेळा भूकंपाची तीव्रता 5.0 ते 5.9 दरम्यान आणि दोनवेळा 6.0 ते 6.9 तीव्रतेचे भूकंप आले. म्हणजे गेल्या चार वर्षांत सर्वाधिक भूकंप या वर्षी झाले.
2023 मध्ये भूकंपाच्या हालचालींमध्ये मोठी वाढ झाल्याचे आकडेवारीत म्हटले आहे. पश्चिम नेपाळमधील अल्मोरा फॉल्ट सक्रिय होणे हे त्याचे प्रमुख कारण आहे. यामुळे 24 जानेवारी 2023 रोजी 5.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. 3 ऑक्टोबर आणि 3 नोव्हेंबर 2023 रोजी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. 3 ऑक्टोबरला झालेल्या भूकंपाची तीव्रता 6.2 होती, तर नोव्हेंबरला झालेल्या भूकंपाची तीव्रता 6.4 इतकी होती.
दोन प्रचंड मोठ्या टेक्टोनिक प्लेट्सच्या सीमेवर वसलेले असल्यामुळे उत्तर भारतापासून ईशान्य भारतापर्यंत पसरलेल्या हिमालयाच्या प्रदेशात वारंवार भूकंप होतात. या प्लेट्सच्या टक्करमुळे भारत आणि नेपाळ, या दोन्ही देशांमध्ये सातत्याने भूकंप होतात. नेपाळ आणि हिमालयीन प्रदेशात जेव्हा जेव्हा भूकंप होतो तेव्हा दिल्ली आणि उत्तर भारताला तो जाणवतो.