नवी दिल्ली: नेपाळमध्ये आज पुन्हा एकदा भूकंप धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.६ एवढी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ होता. यावेळी दिल्ली-एनसीआरसह लखनौमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. उत्तराखंडच्या पिथौरागढ जिल्ह्यातही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवल्याचे सांगितले जात आहे.
सध्यातरी कुठेही नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही. गेल्या शुक्रवारीच नेपाळमध्ये भूकंपाने मोठं नुकासान झालं होतं. यामध्ये जाजरकोटमधील ९०५ घरांचे पूर्णत: तर २७४५ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. रुकुम पश्चिम भागात भूकंपामुळे २१३६ घरांचे पूर्ण नुकसान झाले, २६४२ घरांचे अंशत: नुकसान झाले आणि ४६७० घरांचे माफक प्रमाणात नुकसान झाले.
नेपाळमध्ये वारंवार भूकंप-
आकडेवारीनुसार, नेपाळमध्ये गेल्या ११ महिन्यांत ४ पेक्षा जास्त तीव्रतेचे ७० पेक्षा जास्त भूकंप झाले आहेत. त्यापैकी ५ तीव्रतेचे १३ भूकंप होते. सहा भूकंप ६ किंवा त्याहून अधिक रिश्टर स्केल तीव्रतेचे होते. २२ ऑक्टोबर रोजी आलेल्या ६.१ तीव्रतेच्या भूकंपामुळे काठमांडूमध्ये २० घरांचे नुकसान झाले. यापेक्षा भीषण भूकंप २०१५ साली झाला होता. त्याची तीव्रता ७.८ होती.
भूकंप का होतात?
पृथ्वीच्या आत सात प्लेट्स आहेत, ज्या सतत फिरत असतात. ज्या भागात या प्लेट्स आदळतात त्याला फॉल्ट लाइन म्हणतात. प्लेट्सचे कोपरे वारंवार टक्कर झाल्यामुळे वाकतात. जेव्हा जास्त दाब तयार होतो, तेव्हा प्लेट्स तुटू लागतात. खालील उर्जा बाहेर पडण्याचा मार्ग शोधते आणि गडबड झाल्यानंतर भूकंप होतो.