नवी दिल्ली - Earthquake in Delhi ( Marathi News ) गुरुवारी दिल्ली-एनसीआर परिसरात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. त्याशिवाय जम्मू काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यातही भूकंपाचा धक्का अनुभवल्याचे लोकांनी सांगितले. या भूकंपाचे केंद्रबिंदू अफगाणिस्तानातील फैजाबाद इथं होतं. जवळपास ६.१ रिश्टर स्केलचे हे धक्के असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं.
भूकंपाचे धक्के जाणवताच अनेक लोक घर आणि त्यांच्या कार्यालयाबाहेर पडली. सध्या या धक्क्यामुळे कुठेही नुकसान झाल्याची बातमी नाही. भूकंपाचे हे धक्के केवळ भारतातच नाही तर शेजारील पाकिस्तानातही लोकांना जाणवले. याठिकाणाहून अनेक फोटो समोर आलेत ज्यात घाबरलेल्या अवस्थेत लोकांनी घरातून बाहेर पळ काढला. इस्लामाबाद येथे लोक घरातून पळतानाचे व्हिडिओ समोर आले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, पाकिस्तानात या भूकंपाचे सर्वाधिक धक्के बसले आहेत. जम्मू काश्मीरच्या दक्षिणेकडील भागात राजौरी, पुंछ भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. त्याठिकाणी लोक सुरक्षित ठिकाणी धाव घेत होते.
भूकंप आल्यावर काय करावे आणि काय करू नये -भूकंपाचे झटके जाणवल्यास मुळीच घाबरू नका. सर्वप्रथम, आपण एखाद्या इमारतीत असाल तर त्या इमारतीतून बाहेर मैदानात या. इमारतीतून खाली येताना लिफ्टचा वापर करू नका. हे भूकंपाच्या काळात धोकादायक ठरू शकते. तसेच, इमारतीतून खाली येणे शक्य नसेल, तर जवळच्या एखाद्या टेबलाखाली अथवा बेड खाली लपा.