नवी दिल्ली - देशाच्या दोन वेगवेगळ्या कोपऱ्यात गेल्या काही तांसांत भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यात राजस्थानाच्या बीकानेरमध्ये (Earthquake in Rajasthan Bikaner) 5.3 तीव्रतेचा भूकंप जाणवला. तर मेघालयातही (Earthquake in Meghalaya) भूकंपाचे झटके बसले आहेत. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या बीकानेरमध्ये सकाळी 5 वाजून 24 मिनिटांनी भूकंपाचे झटके जाणवले. रिश्टर स्केलवर याची तीव्रता 5.3 एवढी मोजली गेली.
तसेच, राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने म्हटले आहे, की मेघालयातील वेस्ट गारो हिल्स भागांतही सकाळी 2.10 मिनिटांनी भूकंप आला होता. या झटक्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.1 एवढी मोजली गेली.
यापूर्वी, 18 जुलैला गुजरातच्या कच्छ भागातही भूकंपाचे झटके बसले होते. तेव्हा रिश्टर स्केलवर याची तीव्रता 3.9 एवढी मोजली गेली होती. यापूर्वी याच महिन्यात हिमाचल प्रदेश, आसाम, बंगाल आणि दिल्लीतही भूकंपाचे झटके बसले होते.
भूकंप आल्यावर काय करावे आणि काय करू नये -भूकंपाचे झटके जाणवल्यास मुळीच घाबरू नका. सर्वप्रथम, आपण एखाद्या इमारतीत असाल तर त्या इमारतीतून बाहेर मैदानात या. इमारतीतून खाली येताना लिफ्टचा वापर करू नका. हे भूकंपाच्या काळात धोकादायक ठरू शकते. तसेच, इमारतीतून खाली येणे शक्य नसेल, तर जवळच्या एखाद्या टेबलाखाली अथवा बेड खाली लपा.