ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २६ - उत्तर भारताला भूकंपाचे धक्के बसले असून नवी दिल्ली, श्रीनगर, जयपूर, भोपाळ, शिमला, चंदीगड, हिमाचल प्रदेश अशा अनेक ठिकाणी जवळपास दोन मिनिटे इतका मोठा काळ भूकंपाचे धक्के बसले आहेत. बहुतेक सर्व ठिकाणी कार्यालयातून बाहेर पडून लोक रस्त्यावर आले आहेत. भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानातील हिंदूकुश पर्वत असल्याचे व तिथे ७.७ रिश्टर स्केल इतक्या प्रचंड क्षमतेचा भूकंप झाल्याचे सांगण्यात येत आहे.
उत्तर भारतामधल्या खूप मोठ्या भागाला धक्का जाणवल्याचे वृत्त असले तरी अद्याप सुदैवाने कुठेही जीवितहानी वा मालमत्तेची हानी झालेली नाही. अर्थात, अफगाणिस्थानसह अन्य भागांमध्ये काय स्थिती आहे याबाबत माहिती मिळालेली नाही. पाकिस्तानातील अनेक भागात भूकंपाचे धक्के बसले असून पेशावरपासून २७० किलोमीटर उत्तरेला अफगाणिस्तानात केंद्रबिंदू असल्याचे स्कायमेटच्या अधिका-यांनी सांगितले आहे. नेपाळमध्ये झालेल्या भूकंपाएवढाच हा भूकंप तीव्र असून लोकसंख्येच्या घनतेवर जीवितहानी व वित्तहानी ठरणार असल्याचे स्कायमेटच्या अधिका-यांनी सांगितले आहे.