नवी दिल्ली : उत्तराखंडमध्ये सोमवारी रात्री १० वाजून ३५ मिनिटांनी झालेल्या भूकंपाने उत्तर भारताला जोरदार हादरे बसले असून, राजधानी दिल्लीच्या परिसरात लोक घाबरून रस्त्यावर उतरले होते. उत्तराखंडमधल्या रुद्रप्रयागमध्ये जमिनीखाली ३३ किलोमीटरवर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या भूकंपानंतर राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या दोन तुकड्या रुद्रप्रयाकडे रवाना करण्यात आल्या आहेत. भूकंपाची तीव्रता ५.८ रिश्टर स्केल एवढी नोंदवण्यात आली. मसुरी, सहारनपूर, गाझियाबाद, चंदिगढ, ऋषिकेश आणि डेहराडूनलाही भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती मिळाली आहे. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोक घराबाहेर आले होते, दिल्लीत रस्त्यांवर लोकांची गर्दी झाली होती. डेहराडूनमध्ये भूकंप बराच वेळ जाणवल्यानंतर लोक रस्त्यावर उतरले. उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागालाही या भूकंपाचे धक्के बसले. पंजाबमध्येही भूकंप जाणवला असून, वित्तहानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. या भूकंपाने कच्च्या घरांना धोका संभवण्याची शक्यता भूगर्भ वैज्ञानिकांनी वर्तवली आहे. भूकंपानंतर आता सौम्य धक्के बसण्याची शक्यता आहे. मात्र भूकंपाची तीव्रता कमी असल्याचा अंदाज भूगर्भ वैज्ञानिकांनी वर्तवला आहे.
भूकंपाने हादरला उत्तर भारत
By admin | Published: February 07, 2017 5:44 AM