नवी दिल्ली - एनसीआरसहित संपुर्ण उत्तर भारतात बुधवारी दूपारी भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्लीव्यतिरिक्त जम्मू, श्रीनगर आणि उत्तर प्रदेशमधील अनेक शहरांमध्ये दुपारी जवळपास 12 वाजून 37 मिनिटांनी हे धक्के जाणवले. भूकंपाचे हे धक्के फार वेळ जाणवले असल्याचं लोकांनी सांगितलं आहे. यूएस जिऑलॉजिकल डिपोर्टमेंटने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता 6.1 रिश्टर स्केल इतकी होती. अफगाणिस्तानच्या उत्तर सीमेवर 191 किमी खोल भूकंपाचं केंद्र होतं. पाकिस्तानमधील स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानमधील बलूचिस्तान येथे भूकंपामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत.
दिल्लीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोक आपली घरं आणि कार्यालयातून बाहेर आले होते. जम्मू आणि काश्मीरव्यतिरिक्त हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्येही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपामुळे कोणतंही नुकसान झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये मात्र भूकंपाचे मोठे धक्के जाणवल्याचं समोर आलं आहे. पाकिस्तानमध्ये जिथे लाहोर प्रांतात धक्के जाणवले, तिथे अफगाणिस्तानातील हिंदूकुश परिसरात धक्के जाणवले.