ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 - भारताची सरकारी विमान वाहतूक कंपनी असलेल्या एअर इंडियाच्या महिला कर्मचाऱ्यांनी नुकतीच एका अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. एअर इंडियाच्या संपूर्ण महिला चालक दल असलेल्या विमानाने पृथ्वी प्रदक्षिणा घालण्याचा विक्रम नोंदवला आहे.
महिला चालक दल आणि अन्य महिला कर्मचाऱ्यांच्या अधिपत्याखालील एअर इंडियाचे हे विमान सोमवारी नवी दिल्ली येथून सॅन फ्रॅन्सिस्कोला रवाना झाले. त्यानंतर हे विमान शुक्रवारी भारतात परत आले आहे. बोईंग 777 या विमानाने अमेरिकेला जाताना पॅसिफिक महासागरावरून प्रवास केला होता. त्यानंतर परत येताना हे विमान अटलांटिक महासागरावरून परत आले होते. त्यामुळे या विमानाची पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण झाली. एअर इंडियाने या संदर्भातील माहिती दिली आहे. तसेच गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या विक्रमाची नोंद करण्यासाठी एअर इंडियाकडून अर्ज केला आहे.
या विमान प्रवासाचे वैशिष्ट्य म्हणजे या उड्डाणासाठी चेक इन आणि ग्राऊंड स्टाफ, फिटनेस सर्टिफिकेट देणारे इंजिनिअर तसेच विमानाला नवी दिल्लीतून उडण्याची आणि उतरण्याची परवानगी देणारी एअर ट्रॅफिक कंट्रोलरसुद्धा महिलाच होत्या. आता दरवर्षी आठ मार्चला होणाऱ्या महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर पूर्णपणे महिला टिम असलेल्या विमानांचे उड्डाण करणार असल्याचे एअर इंडियाकडून सांगण्यात आले आहे.