सूर्य मिशनचे जनक प्रोफेसर जगदेव सिंग
आदित्य मिशन का आवश्यक आहे? सूर्यग्रहणादरम्यान सूर्याच्या वातावरणाचा अभ्यास करण्याची खूप मर्यादित संधी असते. ती केवळ ५ ते ७ मिनिटे असते. आकाश ढगाळ असेल तर तो दुर्मिळ क्षणही आपल्या हातातून निसटतो. जर अवकाशात सौर वेधशाळा स्थापन झाली तर आपण सूर्याचा अधिक चांगल्याप्रकारे अभ्यास करू शकू.
कोणत्या प्रकारचा अभ्यास करू शकाल? व्हीएलसी या उपकरणामुळे दोन गोष्टी कळतील. प्रथम आपण पांढऱ्या प्रकाशाखाली प्रतिमा निर्माण करू शकतो. दुसरे म्हणजे, सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान ५४०० अंश सेल्सिअस आहे आणि त्याच्या वातावरणाचे तापमान लाखो अंशांपर्यंत पोहोचते. सूर्याच्या चुंबकीय शक्तीचे ऊर्जेत रूपांतर होते, असे मानले जाते. ते कसे होते, याची अद्याप माहिती नाही. व्हीएलसीमुळे याचा शोध घेणे सोपे होणार आहे.
लॅग्रेज-१ कक्षा कशी आहे? लॅग्रेज-१ वर उपग्रह स्थिर असतो. त्यामुळे उपग्रहाचा इंधनाचा वापर कमी होतो. यामध्ये आदित्य १७८ दिवसांत एक फेरी पूर्ण करेल. पण सूर्य त्याच्यापासून दूर जाणार नाही. उपग्रहाचे आयुष्य ५ वर्षे आहे, तरी तो १० वर्षांपेक्षा जास्त काळ टिकेल व भरपूर आकडे उपलब्ध होतील.
स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटत आहे का ? अर्थात, प्रत्येकाने काम केले आहे. आकडे मिळण्याची वाट पाहतोय. विद्यार्थ्यांनी आणि शास्त्रज्ञांनी याचा अभ्यास करावा, अशी माझी इच्छा आहे.
मिशनचे इतर कोणते फायदे होतील? सौर वादळ एक-दोन दिवसात पृथ्वीवर पोहोचते. आपले उपकरण सूर्याचे अगदी जवळून निरीक्षण करू शकते. सौर वादळ उठताच त्याची गणना करून ते पृथ्वीवर कधी पोहोचेल, याचा अंदाज बांधता येईल. हवामानाच्या अंदाजाप्रमाणे, आम्ही सौर वादळांचाही अंदाज लावू शकतो. याच्या मदतीने घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे किंवा उपग्रह बंद करून त्यांना नुकसान होण्यापासून वाचविता येईल.
यावेळीही महिला शास्त्रज्ञाचा मोठा हातभार
आदित्य एल-१चे यशस्वी प्रक्षेपण होण्यात या प्रकल्पाच्या संचालक निगार शाजी यांचे मोठे योगदान आहे. इस्रोमध्ये गेली ३५ वर्षे सेवा बजावत असलेल्या निगार शाजी यांनी रिमोट सेन्सिंग, दळणवळण, आंतरग्रहीय उपग्रह मोहिमा यांच्या आखणीत महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. निगार शाजी तामिळनाडूमधील तेनकासी येथील मूळ रहिवासी आहेत. भारताच्या तीन चंद्रयान मोहिमांचे नेतृत्व करणारे मयिलसामी अण्णादुराई, एम. वनिता, पी. वीरामुथूवेल हे तीनही शास्त्रज्ञ तेनकासीचेच मूळ रहिवासी आहेत. रिसोर्ससॅट-२ए या प्रकल्पाच्या त्या सहयोगी प्रकल्प संचालक होत्या.