ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - वैयक्तिक पातळीवर बीफ खाणे ठीक आहे, पण त्याचवेळी इतरांच्या भावना दुखावणार नाहीत हे ध्यानात ठेवावे' असे मत भाजपाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री कलराज मिश्रांनी व्यक्त केले. 'जर लोकांना बीफ खायचे असेल, तर तुम्ही त्यांना कसे थांबवू शकता?' असा सवालही त्यांनी विचारला. मात्र सामूहिक स्तरावर या सगळ्या प्रकाराचे समर्थन करत, घोषणा देऊन बहुसंख्यांच्या भावना दुखावणे, हे अयोग्य असून ते टाळले पाहिजे, असेही मिश्रा यांनी सांगितले.
बीफ खाल्ल्याच्या मुद्यावरून उत्तर प्रदेशमधील दादरी येथे एका व्यक्तीला काही लोकांनी मारहाण केल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरून देशभरात माजलेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर मिश्रा यांनी हे वक्तव्य केले.
समाजाचे ध्रुवीकरण करण्यासाठी अशाप्रकारचे मुद्दे उचलून धरले जातात, मात्र हे (ध्रुवीकरण) धोकादायक आहे. देशातील बहुसंख्य जनतेला हे सगळं नकोय, अनेक लोक बीफ खातात, वैयक्तिक स्तरावर ते ठीक असलं तरी इतरांच्या भावनांचाही आदर राखा, असे मिश्रा यांनी म्हटले.